अशिक्षित समाजाच्या उपेक्षित गृहिणी : संत सोयराबाई परिवर्तिनी एकादशीच्या निमित्ताने.. 

abhishek bakkewad
10 Min Read
Spread the love

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी 

अहमदनगर – शनिवार. 14/09/2024 वर्णव्यवस्थेतील चौथ्या शूद्र वर्णात जन्माला आलेल्या संत सोयराबाईनी 92 अभंग लिहिलेले असून सुद्धा समाज व्यवस्थेने त्यांचा कोठेही मोठ्या प्रमाणात उदोउदो केला नाही, त्यांनी रचलेले अभंग अतिशय मार्मिक व परखड असून समाजप्रबोधन पर आहेत. त्यामध्ये कसल्याही प्रकारचा वादविवाद नाही ,शब्दांना वैचारिकतेची धार आहे. 

   संत चोखामेळा यांच्या त्या धर्मपत्नी असून काही साहित्यिकांनी,कवीनी, त्यांच्यावर थोडेफार लेखन केले, परंतु पंढरपुरात त्यांचे मोठे मंदिर उभारले नाही. समाजामध्ये अढळाचे स्थान म्हणावे तसे त्यांना आजही मिळाले नाही,त्यांच्या कुटुंबात संत सोयरा, संत निर्मळा, संत बंका, संत कर्ममळा, संत चोखामेळा या पाच संतांनी त्यांच्या अभंग रचना लिहून ठेवल्या आहेत. तरीही ते गाव कुसाबाहेरचेच म्हणून राहिलेले आयुष्य भर राहिलेआहेत. प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंगानी सोयराबाईचे बाळंतपण केले असे वारकरी संप्रदायात दाखले आहेत. परंतु भारतीय समाज व्यवस्थेने यांना म्हणावी तशी आजही प्रसिद्धी दिली नाही ही खंत मनाला लागल्यामुळे त्यांच्याबद्दल चार शब्द लिहावेत म्हणून हा शब्द प्रपंच…

संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्य लोकांना समजण्यास सोपा व सरळ होता, आणि विशेष म्हणजे त्या स्त्री-पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश घेता येत होता,

म्हणूनच अशिक्षित असूनही संत सोयराबाईंनी लोकभाषेतून आपले विचार अभंगाच्या माध्यमातून प्रकट केले. त्यामुळे भारतीय संस्कृतीची पकड मजबूत झाली. पांडुरंग हे त्यांचे दैवत असून रखुमाई ही त्यांची माता होती. पंढरपुरात चंद्रभागे स्नान करून सर्व संत मंडळी भक्ती रसात न्हाऊन निघत असत. त्या अस्पृश्य जातीत जन्मल्या मुळे चातुर्वर्ण्य पद्धती बाजूला सारून जातीचा अहंकार मनातून काढून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे आहोत अशी शिकवण त्या काळात निर्भीडपणे समाजाला दिली.परमार्थ करीत असताना त्यांनी आपली रोजची कर्तव्यकर्म सोडली नाहीत, हे विशेष येथे सांगायचे आहे, प्रपंच व परमार्थ यांचा समतोल जाणणारी ती पहिली संवेदनशील स्त्री होती. प्रपंच करून परमार्थामध्ये देवासी संवाद साधणारी, अस्मिता जोपासणारी स्त्री असल्याने त्यांचा परमार्थिक अधिकार संताच्या मांदियाळीत फार मोठा झाला. 

त्यांनी आपल्या भक्तीने परमेश्वराला प्रसन्न करून घेतले. अनेक वर्षानंतर कर्ममेळा हा मुलगा झाल्यामुळे घरी बोलावून पांडुरंगाला व संताना भोजन दिले, असे दाखले वारकरी संप्रदायात उपलब्ध आहेत. त्यांनी 92 अभंगाची रचना केली. त्यांच्या साध्या सरळ निष्कपट स्वभावाचे प्रतिबिंब त्यांनी केलेल्या अभंगातून आपणास प्रत्यक्ष पाहायला मिळते,त्यांनी रचलेले अभंग अतिशय मार्मिक सुरेख शुद्ध आणि सुसंस्कृत आहेत.आपल्या सडेतोड वाणीने त्यांनी देवाकडे आपल्या समाजाची झालेली दुर्दशा अभंगातून मांडली. म्हणून आज आपण संत सोयराबाईच्या चरित्रकार्याची व पांडुरंग भक्तीची माहिती करून घेत आहोत.संतानी समाजाला दिलेले नैतिकतेचे आणि शांततेचे मानवतावादी तत्त्वज्ञान आजच्या भौतिक सुखाच्या विज्ञान युगात सुद्धा मानवाला उपयोगी पडणारे आहेत. सामाजिक दृष्ट्या शूद्र ठरविलेल्या वर्णामध्ये संत सोयराबाई यांचा जन्म झाला.त्यांनी अनन्य साधारण भक्तीने व निष्ठेने वारकरी संप्रदायात अढळ स्थान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. 

सर्व बाजूनी आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परमेश्वर पद सुद्धा प्राप्त करता येते, हे त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवले, या काळात सोहळे -ओवळे व आचरणाला जास्त महत्त्व दिले जात होते. माणूस माणसाला हीन व अस्पृश्य समजत होता.श्रेष्ठ कनिष्ठता नसतानसात ठासून भरली होती. समाजाच्या खालच्या थरातील लोकांना परमार्थाची दारे पूर्णपणे बंद केली होती. आत्मविश्वासाचा मार्ग खुंटला होता. सामाजिक जीवनात त्यांना थोडी सुद्धा प्रतिष्ठा नव्हती. पंडित स्वतःला विद्वान समजत होते. समाजातील तळाचा वर्ग अज्ञानात पूर्ण बुडलेला होता. समाजाच्या या सर्व परिस्थितीचे चटके संत चोखामेळा आणि संत सोयराबाई यांनी जीवन भर सोसले.

महाराष्ट्रात संत वाड;मयात नुसते तत्त्वज्ञान नाही तर आचरणात आणण्यासाठीची शिकवण आहे. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा

 ,अंधश्रद्धा यावर कडाडून टीका करण्याचे काम सर्व संतांनी केले. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात संत सोयराबाई, यांची निर्मळ भक्ती अतिशय उच्च दर्जाची व वास्तविक होती. वारकरी संप्रदायात ज्याप्रमाणे संतांनी समाजाला सुधारण्यासाठी अभंगाच्या रूपाने उपदेश केला.

तसेच संत सोयराबाईनी स्वत: च्या

अभंग रचनेतून पांडुरंगाला अनेक प्रश्न विचारले. समाज व्यवस्थेच्या मध्ये आम्हाला तुम्ही असे का दूर ठेवले? म्हणून विठ्ठल भक्तीचा अधिकार सर्वांना आहे हे दाखवून दिले. ज्ञान आणि कर्म यांची सांगड त्यांनी घातली

.विवेकाने नीतीचा प्रसार केला. विठ्ठलमय भक्तीने तल्लीन होऊन गेलेल्या संत सोयराबाईंनी आपल्या मनातील व्यथा परमेश्वरा जवळ मांडल्या. त्यांचे अभंग समाजाला अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारे व अंधश्रद्धा, रूढी परंपरा यावर कडाडून हल्ले करणारे आहेत.आज सातशे वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी वारकरी संप्रदायांमध्ये उच्च-नीच. गरीब -श्रीमंत, लिंगभेद नाही. वयाचा सन्मान करून एकमेकाच्या चरणांना पंढरपुरातील वाळवंटात स्पर्श करून माऊली म्हणून हाक दिली जाते, हे वर्ण व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आध्यात्मिक ठिकाण आहे.

 त्या शूद्र वर्णात जन्माला आल्याने परमेश्वरांना अभंगाच्या रूपाने सांगतात. आम्ही अस्पृश्य समाजाची कामे करण्यासाठी जन्मलो आहोत. आम्ही साफसफाईच्या व्यवसाय करतो, मेलेली जनावरे ओढून गावाच्या वेशीवर बाहेर टाकतो. व त्यांची कातडे काढून विकतो. गावातील घाण स्वच्छ करतो. गावातील मरण पावलेल्या व्यक्तींची खबर आम्ही दुसऱ्या गावातील लोकांपर्यंत पोहोचतो, अशी कामे आम्हाला करावी लागतात असे त्या परमेश्वरा जवळ आपले परखडपणे गा-हाणे मांडतात. मंगळवेढा येथे वास्तव्य करीत होते. 

संत चोखोबा हे आपले नित्यकर्म करीत. विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले होते. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत सेना, संत सावता, संत गोरोबा यांच्या मांदियाळीतील ते संत होते वारकऱ्यासारखे आपणही पंढरपूरला जावे, विठ्ठलाची मूर्ती पाहून मनोभावे दर्शन घ्यावे. असे त्यांना वाटले; परंतु समाज व्यवस्थेने त्यांना मंदिरात प्रवेश दिला नाही. उलट त्यांना मारहाण करून मंदिरातून बाहेर हाकलून दिले.यावेळी संत सोयराबाईना ही घटना कळाली. तेव्हा त्यांना फार पश्चात्ताप झाला. 

दोघा पती -पत्नीनी हा प्रसंग फार संयमाने हाताळला, आणि विठ्ठल भक्ती मध्ये तल्लीन झालेले संत चोखोबा व संत सोयराबाई, संत निर्मळाबाई,संत बंका व संत कर्ममेळा एकाच घरातील पाचजण संत होते. प्रत्येकाने आपापल्या अभंगातून समाज व्यवस्थेचे वर्णन केलेले आहे. यासाठी आपण आता संत सोयराबाई यांनी लिहिलेला हा पुढील अभंग या ठिकाणी निरूपणासाठी घेत आहोत. 

अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग।।१।। या अभंगातून संत सोयराबाईनी मनाची अवस्था येथे प्रकट केली आहे.आपण सर्वजण एक आहोत,ही चराचर सृष्टी सर्वांची आहे. इथे कसलाही भेदभाव नाही सर्व जमलेल्या भक्तांना सांगत, सर्वांचे रंग रूप वेगळे असले तरीही सर्वात विठ्ठलाचे रूप दिसू लागते.

 मी तूं पण गेले वायां । पाहता पंढरीचा राया ।।२।। कितीही धनाने मोठा व्यक्ती असला तरी मी पणाचा गर्व येथे खरोखर नाहीसा होतो. तेथे गेल्यावर सगळे एका परमेश्वराचीच लेकुरे असतात, विठू माझा लेकुरवाळा। संगे गोपाळाचा मेळा।।.एकदा का पांडुरंगाचे दर्शन झाले की देहभान विसरते आणि मनाला आनंद वाटतो म्हणून त्या म्हणतात. नाही भेदाचे तें काम

     पळोनि गेले क्रोध काम।।३।। सर्वत्र सारखीच परिस्थिती आहे. सर्वांनिभुती आत्मा एकच आहे. तर भेद कशासाठी करीत आहोत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।। असे म्हणतात. आपल्या मनात असणारे षड्रिपू तुम्ही काढून टाका. सर्व जीवसृष्टी एकच आहे त्यासाठी भेदाभेद करू नका. भेदाभेद संपुष्टात आला की काम, क्रोध, मोह, मत्सर आपोआप पळून जातात. 

देहि असोनि तूं विदेही। सदा समाधिस्थ पाही।।४।। देहाच्या अस्तित्वाच्या जाणिवेचा लवलेश अजिबात नाही, म्हणून सदा समाधीस्थ झाला आहे,पंचमहाभूतांनी हा देह भरलेला आहे. त्यामुळे तो पंढरीचा राया शांतपणे बसला आहे. त्यामुळे ही सृष्टी युगानुयुगे स्थिर आहे. *पाहते पाहणे गेले दुरी । म्हणे चोखियाची माहरी।। ५।।

संत सोयराबाई या महान पतिव्रता आहेत. त्यांना विठ्ठलाचे दर्शन घेण्याची आस लागली होती.त्यामुळे त्यांना पांडुरंगाचे दर्शन मिळाले आणि त्या कृतकृत्य झाल्या, आता मला पाहण्या सारखे आता या जगात उरले नाही, नेहमी त्या अभंगाच्या शेवटी मी चोख्याची महारीअसे त्या स्पष्ट म्हणतात. वारकरी संप्रदायात या दोघा पती -पत्नीने अतिशय मार्मिक असे अभंग रचना करून समाजात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

    आयुष्यभर विठ्ठलाचे भजन करून सुखाने प्रपंच केला. संत चोखोबांनी  माझा शीणभाग अवघा हरवला। विठोबा विटेवरी देखिला।। म्हणून विठ्ठला बद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या चरणी ते नतमस्तक झाले, संत चोखोबाना संसारामध्ये राहून सुद्धा महाद्वाराच्या पायरीला जागा मिळाली त्यांच्या बरोबर संत सोयराबाई ही पांडुरंगाच्या भक्तीत विलीन झाल्या, त्यामुळे समाजातील भेदभाव कमी होण्यास मदत झाली. येथे जातीपातीच्या बंधनाच्या शृंखला गळून पडतात आणि आपण सर्वजण एक आहोत याची जाणीव होते. शेवटी एवढेच सांगू शकतो की? काळ कोणताही असला तरीही अधर्मच तो अधर्मच असतो, त्या काळातील समाज व्यवस्थेने या कुटुंबालांना नाहक त्रास दिला हे मात्र त्रिवार सत्य आहे. सामाजिक दाहकतेचे चटके त्यांनी सोसले, लोकांनी त्यांची कुचेष्टा केली. ज्या काळात स्पर्श करायला सुद्धा भीती वाटत होती, विटाळ होत असे, थुंकण्यासाठी कमरेला गाडगे बांधणे व पायाला झाडू बांधून शूद्र जातीतील लोकांना फिरावे लागत असे, पोथीपुराण ऐकल्यास कानामध्ये गरम शिसे टाकले जात असे. त्या काळात सुद्धा संत सोयराबाईनी केलेली हे महान कार्य वाखाण्याजोगे आहे. भारतीय राज्यघटनेने समानतेचा अधिकार सर्वांना दिला. परंतु आजही तळागाळातील व खेड्यापाड्यातील लोकांना अस्पृश्यतेच्या नावाखाली लहान-मोठे हल्ले होतच आहेत हे कुठेतरी थांबणे आज गरजेचे आहे, तेव्हाच आपल्या देशाला धर्मनिरपेक्षवादी देश मोठ्या मनाने म्हणता येईल. 

प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत

अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

Share This Article
error: Content is protected !!