उमरी तालुका प्रतिनीधी/ उद्धव मामडे
उमरी – सर्वत्र महसूल विभाग व कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प तीन वर्षापासून राज्यभर राबवण्यात येत आहे. मात्र ई-पीक पाहणी हे ॲप अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून ग्रामीण भागात नेटवर्कचा अडसर व अशिक्षीत शेतकऱ्यांना या ॲपद्वारे माहिती भरण्याचे अपुरे ज्ञान यामुळे हे ‘ई -पीक पाहणी’ प्रकल्प कुचकामी ठरल्याचे चित्र उमरी तालुक्यात पाहवयास मिळत असून आता केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने तलाठ्यासह शेतकऱ्याची डोकेदुखी वाढली असल्याचे दिसून येते.
महसूल व कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राज्यभर राबवण्यात येत आहे. “माझी शेती, माझा सातबारा, मी करेल माझा पिकपेरा” या ब्रीद अन्वये मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने ई पिक पेरा नोंदणी पद्धतीस तीन वर्षांपूर्वी राज्यात सुरुवात झाली. काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. मात्र धानोरा बु.परिसरासह उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नोंदणीसाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. पंधरा सप्टेंबर अखेरपर्यंत आपल्या पिकांची नोंदणी करावयाची आहे, नोंदणीसाठी केवळ चार दिवस शिल्लक राहीले असुन जे ई – पिक पेरा नोंदविण्यापासून वंचित राहीले त्यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. आजपावेतो दिड महिना उलटून गेला तरी अद्याप शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण झाली नसल्याने आता केवळ चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही. उर्वरित चार दिवसांत शेतकऱ्यांनी आता ई पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन उमरी तहसीलदार थोरात यांनी केले आहे.
ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना शेतात जाऊन शेतातील पिकांच्या लोकेशनसह फोटो अपलोड करावा लागतो. हे करत असताना स्वतः शेतकरी असणे आवश्यक आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक शेतकरी अँपवर नोंदणी करत असल्याने अनेकदा संकेतस्थळ चालत नाही, तर काही शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईलच नाही,अन् ज्यांच्याकडे आहे त्यातील अनेकांना ही माहिती भरण्याचे परिपूर्ण ज्ञान नसल्याने त्यांची अडचण होत आहे. एवढेच नव्हे तर मोबाईल क्रमांकावर येणार सांकेताक वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अवघा दिवस व वेळ वायाला जाऊनही काही उपयोग होत नसल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. शेतात सोबतीला मार्गदर्शनासाठी कुणी नसल्यास हे अँप डोक्याला ताप ठरत आहे. शेतावर सर्वत्र नेटवर्क मिळत नसल्याने सर्वच प्रक्रिया ठप्प होवून मानसिक त्रास सोसावा लागत आहे..
अनेक ठिकाणी महसुल विभागासह कृषी विभागाने पाठ फिरवली असली तरी काही तलाठी आप्पा स्वतः शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आपापल्या सज्जाच्या गावी जाऊन ई – पिक पाहणीचे धडे देत आहे. ‘शेतकऱ्यांना ई – पिक पाहणी नोंदणीसाठी आता केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहीला आहे. तातडीने व काम केल्यास व नेटवर्क मिळाल्यास ई पीक पाहणी नोंदणीन्वये सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद होईल. ही नोंद केल्यानंतर पुन्हा नोंद करण्याची शेतकऱ्यांना गरज नाही.ही
नोंद न केल्यास संबंधीत क्षेत्र पडीत समजले जाईल व नुकसान भरपाई, विमा लाभ मिळणार नाही.”