माहूर तालुका प्रतिनिधी/ विजयसिंह हजारी
माहूर – दि.१६ सप्टेंबर ; अनेक वर्षाची धार्मिक उत्सव परंपरा लाभलेल्या शहरातील श्री कपिलमुनी गणेश मंडळाच्यावतीने स्थापनेपासूनच विविध प्रकारचे धार्मिक,प्रबोधनात्मक, व्यसनमुक्ती,क्रिडा स्पर्धा,भजन आदिसह सामाजिक बांधिलकी व समाजातील एकोपा वाढीस लावणारे विविध उल्लेखनीय कार्यक्रम घेण्यात येतात.त्याच अनुषंगाने मंडळाच्या वतीने सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी गणेश भक्तांच्या सेवेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.भाविक भक्तांनी या तिर्थप्रसाद व महाप्रसाचा लाभ घ्यावा!असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ५४ गावात सार्वजनिक गणेश मंडळाकडून ‘एक गाव एक गणपती ‘ या संकल्पनेतून अभिनंदनीय उपक्रम राबविला जात आहे. तर शहरात परवानगी प्राप्त १४ सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने श्री गणेश मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली आहे.
वार्ड क्र. १ मधील श्री कपिलमुनी गणेश मंडळ दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबविण्यात अग्रेसर असल्याचे दिसून येत असून, मंडळाच्या वतीने श्री विराजमान असलेल्या मंडपात आकर्षक देखावे लावण्यात आले आहे. जे येथे श्री च्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. ज्यामध्ये ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा नैसर्गिक संपत्ती वाचवण्यासाठी उपदेश करणारा तर, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारा यासह लक्षवेधी संदेश लिहीलेले देखावे लावण्यात आले आहेत.
यावर्षी ०७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवास सुरुवात झाली असून,स्थापनेपासून श्री कपिलमुनी गणेश मंडळ,श्री कपिलेश्वर मंदिर,माहूरगडच्या वतीने १३ रोजी स्थानिक महीला भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा धार्मिक कार्यक्रम सादर करण्यात आला. १४ व १५ रोजी लहान मुलामुलींसाठी संगीत खुर्ची, लिंबू-चमचा,अडथळ्याची शर्यत अशा पारंपरिक क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या.तर आज सोमवार दि.१६ रोजी दुपारी ३:०० ते सायंकाळी ०८ वा. पर्यंत भाविक भक्तांसाठी श्रीच्या भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे १७ रोजी ‘द केरला स्टोरी व द कश्मीर फाईल्स’ हे भारतातील ज्वलंत समस्येवरील आधारलेले व गाजलेले हिंदी चित्रपट रसिकांना मंडळाच्या वतीने भव्य प्रोजेक्टरवर दाखविले जाणार आहेत.
१७ रोजी राज्यातील जवळपास सर्वच सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मुर्तीचे भक्ती भावाने विसर्जन करण्यात येते. परंतु, माहूर शहरातील गणेशाचे विसर्जन हे दुसऱ्या दिवशी करण्याची परंपरा चालत आलेली असल्याने येथील गणेश विसर्जन हे १८ रोजी वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात येऊन संपन्न होणार आहे. डिजे डॉल्बी म्युझिक सिस्टम च्या वापरावर पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली असल्याने श्री विसर्जन हे पारंपरिक ढोल-ताशा,बॅण्ड या वाजंत्री व भजनी मंडळाच्या सुमधुर तालावर नाचत साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे श्री कपिलमुनी गणेश मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह हजारी यांनी सांगितले आहे. श्री मुर्ती स्थापनेपासून मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह हजारी, उपाध्यक्ष आशुतोष कुमरे, सचिव नकुल पस्पुलवार, कोषाध्यक्ष भावेश शेवाळे सह सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते विविध प्रकारच्या कार्यक्रमासह गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत.