खा.पाटील यांच्यासोबत नगराध्यक्ष दोसानी यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट!
नांदेड जिल्हा प्रतिनिधी बजरंगसिंह हजारी
माहूर – तीर्थक्षेत्र माहूर शहराचे प्रलंबित विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी आज बुधवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी खा.नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांची भेट घेतली असता; माहूर शहरा लगतच्या मालवाडा घाटातील अर्धवट असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर शारदीय नवरात्र पूर्वी तोडगा काढू व शहरातील रोहित्र अभावी बंद असलेले पथदिवे हे सुद्धा नावरात्रापूर्वी सुरू करण्यासाठी महामार्ग विभागाला तातडीच्या सूचना देण्यात येईल!” अशी ग्वाही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली.यावेळी लांजीचे सरपंच मारोती रेकुलवार,
अमित येवतीकर यांची उपस्थिती होती.
माहूर शहरापासून जेमतेम अवघ्या दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या मालवाडा घाटात मागील दोन वर्षापासून रस्ता अर्धवट आणि एकेरी स्थितीत आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या या रस्त्यावर वनविभागाने दावा केल्याने हे काम थांबले आहे.विशेष म्हणजे एका बाजूने सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम काही प्रमाणात झाले होते,तर एका बाजूने खोदून ठेवलेला रस्ता गिट्टी व इतर बांधकाम साहित्य टाकून बंद करण्यात आला आहे.
माहूर हे राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री रेणुका देवीचे एक मुख्य पिठ आहे.याठीकाणी भरणाऱ्या विविध यात्रोत्सवांपैकी सर्वात मोठा व दिर्घ कालावधीत साजरा करण्यात येणारा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्र महोत्सव होय.येत्या काही दिवसांवर हा उत्सव येऊन ठेपला असून,श्री रेणुका देवी संस्थान व तालुका यात्रा प्रशासन यात्रा महोत्सवाच्या जय्यत तयारीला लागला आहे. परवा माहूर दौऱ्यावर खा.नागेश पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत माजी.आ.प्रदीप नाईक व
शिवसेना (उबाठा) ज्योतिबा खराटे यांनी मालवाडा घाटातील अर्धवट रस्त्याचा विषय खासदारांच्या लक्षात आणून दिला होता.तर नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी माहूर शहरातील पथदिवे महामार्ग विभागाच्या दुर्लक्षित धोरणानामुळे बंद असल्याने रात्रीला शहरात काळोख पसरत असल्याचे लक्षात आणून दिले होते.
तीर्थक्षेत्र माहूर शहरात उद्भवलेल्या या गंभीर समस्या सोडविण्यासाठी खा.नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना बोलावून घेत नांदेड जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांची भेट घेतली असता याविषयी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व समस्यांवर नवरात्र पूर्वी तोडगा काढण्यात येईल! असा विश्वास जिल्हाधिकारी राऊत यांनी यांनी दिला आहे.