नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
नांदेड – ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेले राज्यातील महायुती सरकार लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश न मिळाल्याने अधिक सावध भुमिका घेत असल्याचे दिसून येते.केंद्र सरकारच्या मदतीने
विधानसभा निवडणुकीआधी राज्य सरकारकडून विविध जनकल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री शिंदे हे राजकारणातील मुरब्बी नेते दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सहकार्याने अनेक धडाकेबाज निर्णय घेत विरोधकांच्या नरेटिव प्रचाराचे मनसुबे अक्षरश: चिंधड्या-चिंधड्या करीत आहेत.शेतकरी,बेरोजगार,लाडकी बहीण, लाडका भाऊ यानंतर आता नाममात्र मानधनाचे केवळ नामधारी मानकरी असलेले गावप्रमुख राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार ६ हजार, ८ हजार आणि १० हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळणार आहे. तर उपसरपंचांना २ हजार, ३ हजार आणि ४ हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळणार आहे.
सध्या सरपंचांना ३ हजार, ४ हजार आणि ५ हजार रुपये इतके मानधन मिळते. तर उपसरपंचांना १ हजार, दिड हजार आणि २ हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळते. राज्यात २७ हजार ९४३ ग्रामपंचायती आहेत.
यावरील सर्व सरपंच, उपसरपंच यांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार दुप्पट मानधनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आधीचे कामधारी मात्र नामधारी सरपंच,उपसरपंच यांची तर आता खरोखरच ‘चल पडी’ असेच म्हणावे लागेल.