माहूरगडावर नवरात्र उत्सव आढावा बैठक संपन्न.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
नांदेड – देशभरातील भाविकांच्या डोक्यावर सदैव श्री रेणुकादेवीच्या कृपाशीर्वादाचा व छत्रछायेचा अगाध महिमा असून,कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान, कुलदैवत असलेले कुलस्वामिनी श्री रेणुका मंदीर देशभरात सुप्रसिद्ध आहे. सोईसुविधा व व्यवस्थापनाच्याबाबतीत देखील माहूर तीर्थक्षेत्राचे नाव इतर तिर्थक्षेत्राप्रमाणेच सर्वदूर घेतले गेले पाहिजे यासाठी याठिकाणचा शारदीय नवरात्र उत्सव नियोजनबद्ध यशस्वीपणे शांततेत पार पाडण्यासाठी व्यावसाईक, व्यापारी,शहर व परिसरातील नागरिक तथा भाविक भक्त या सर्वांनी यात्रा नियोजन प्रशासन व मंदीर प्रशासनास आवर्जून सहकार्य करावे! ” असे नम्र आवाहन श्री रेणुकामातेस वंदन करत श्री रेणुकादेवी संस्थानच्या पदसिद्ध अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी केले.

राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ असलेल्या माहूर येथील श्री रेणुकादेवी मंदीर गडावर गुरुवार दि.०३ ऑक्टोबर, आश्विन शुद्ध १प्रतिपदेस घटस्थापना होऊन शनिवार दि. १२ ऑक्टोबर, आश्विन शुद्ध ०९श्रवण विजयादशमी या कालावधीत संपन्न होणाऱ्या तथा माहूरगडावरील सर्वात मोठा आणि दिर्घ कालावधीत साजरा करण्यात येणारा धार्मिक यात्रोत्सव असलेल्या यंदाच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नियोजनाची आढावा बैठक शुक्रवार दि.२७ सप्टेंबर रोजी दुपारी श्री रेणुकादेवी संस्थानच्या पदसिद्ध अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश,
नांदेड सुरेखा कोसमकर यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत,पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,सहाय्यक जिल्हाधिकारी,किनवट तथा संस्थानच्या पदसिद्ध सचिव मेघना कावली,उपविभागीय पोलीस अधिकारी तथा संस्थानचे पदसिद्ध उपाध्यक्ष रामकृष्ण मळघणे,माहूर तहसीलदार तथा संस्थानचे पदसिद्ध कोषाध्यक्ष किशोर यादव,गटविकास अधिकारी सुरेश कांबळे,नगरपंचायत मुख्याधिकारी विवेक कांदे आणि श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय कान्नव,बालाजी जगत दुर्गादास भोपी,व्यवस्थापक योगेश साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गडावरील श्री परशुराम मंदिर,सभामंडपात संपन्न झाली.या बैठकीत यात्रेशी निगडीत तालुका प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांनी पूर्व तयारी म्हणून केलेल्या व सुरू असलेल्या एकंदरीत कामाचा आढावा सर्वांपुढे सादर केला.
यावेळी मार्गदर्शनपर सूचना देताना संस्थानच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर अध्यक्षीय समारोप करताना बोलत होत्या.
या बैठकीत नगरपंचायत मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी यात्रा काळात सर्व सोयी सुविधायुक्त वाहनतळ,फिरते शौचालय, अस्थाई स्वच्छता गृह,लाईट, सीसीटीव्ही,
पिण्याचे पाणी, आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशमन दल,भाविकांना यात्रा मार्गदर्शक केंद्र आदी बाबींची पूर्तता करण्याची ग्वाही दिली.
यात्रा परिवहनासाठी महत्त्वाचे असलेल्या एसटी बस बाबतीत माहूर आगार प्रमुख यांनी गडावर जाणे येण्याकरिता सुस्थितीत असलेल्या १०० बसेसची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले.
विद्युत वितरण कंपनीचे अभियंता यांनी अपवादात्मक परिस्थिती वगळता गुंजवरून विद्युत पुरवठा खंडीत न झाल्यास यात्रा काळात अखंड विद्युत पुरवठा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची हमी दिली.
प्रभारी पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुरेपूर पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.
तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता भिसे यांनी आमच्या विभागा अतिरिक्त असलेल्या गडावर जाणाऱ्या रस्त्याची डागडुगी करून वाहतुकीस कुठलाही अडथळा येणार नाही याबाबत दक्षता घेणार असल्याचे सांगितले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माचेवार यांनी औषधी साठा,रुग्णवाहिका तसेच शहरातील दत्तचौक, रेणुका माता,दत्ता शिखर,अनुसया मंदिर याठिकाणी आरोग्य सुविधा केंद्र व पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मान्य केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण वाघमारे यांनी ५० बेड, आरोग्य पथक व रुग्णवाहिका सुसज्ज ठेवणार असल्याचे सांगितले.
विशेषतः माहूर तिर्थक्षेत्र परिसरातील मंदिरे,रामगड किल्ल्यावर असलेले महाकाली देवी मंदिर,मातृतिर्थ तलाव यासह जवळपास डझनावर संरक्षीत स्मारके पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून या सर्वच ठिकाणावर दर्शन व पर्यटनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते.असे असताना देखील पुरातत्व खाते व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे या महत्वपूर्ण बैठकीकडे सपशेल पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या बैठकीत पत्रकारांनी यात्रेच्या संबंधाने प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या. त्या सूचनांची पुर्तता करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी सर्व विभाग प्रमुखांना आदेशित केले.
यावेळी संस्थानचे विश्वस्त, संबंधित विभागांचे कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
या बैठकीचे प्रास्ताविक संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी केले.