माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर – एकिकडे हिंदू धर्मातील सर्वात मोठा नारीशक्ती महोत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे.तर,दुसरीकडे विधानसभा निवडणूकीची राजकीय दंगल देखील सुरू होणार आहे.अशा या दुग्धशर्करा योगावर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.अनेक नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. याचपार्श्वभूमीवर
भाजपाचे नेते तथा माजी मंत्री तर भाजपचे विद्यमान विधानसभा निवडणूक संयोजक रावसाहेब दादाराव दानवे यांनी आज रविवार दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी माहूर येथे येऊन गडावरील श्री रेणुकादेवीचे दर्शन घेतले.
म्हणतात ना कोणत्याही राजकीय निवडणूका लागल्या कि, नेत्यांना सर्वात आधी सर्वतारी दुख:हारी देवीदेवता आठवतात.”मी निवडून येऊ दे, माझ्या पक्षाला, युती,
आघाडीला बहुमत मिळु दे अन् आमचेच सरकार सत्तेत येऊ दे! असे प्रार्थनारुपी साकडे,
ईश्वराचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मग ते आपापले आराध्यदैवत कुलदैवत, कुलदेवता,कुलस्वामिनीचे
मंदीरं गाठतात.याच हेतूने माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज माहूरगडावरील श्री रेणुकामातेचे दर्शन घेऊन महाआरती केली.धार्मिक विधी पश्चात दानवे यांचा मंदिर संस्थान विश्वस्तांच्या हस्ते मातेचा प्रसाद देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
एकीकडे महायुतीमधील नेत्यांचे दौरे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत.या दौऱ्यांच्या माध्यमातून नेते मंडळी मतदारसंघाचा आढावा घेत आहेत.तसेच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणीही सुरु असून मॅरेथॉन बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे. या बैठकांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे.
नवरात्र उत्सवादरम्यान माहूरगडावर मातेच्या दर्शनासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,कृषी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खा.भास्करराव खतगावकर, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेतेमंडळी रेणुकादेवीच्या दरबारात दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावत असतात. तर यावर्षी नवरात्र सुरू होण्याआधी माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज मातेचे दर्शन घेऊन आशिर्वाद प्राप्त केला.