सामाजिक भान जपणारे साहित्यिक:विठ्ठल बरसमवाड २ऑक्टोबर रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत.

abhishek bakkewad
8 Min Read
Spread the love

नांदेड – माणुस किती जगला यापेक्षा कसा जगला म्हणजे कोणती मूल्य घेऊन जगला हे महत्त्वाचे आहे. माणसाच्या जीवनाला नुसती लांबी असून चालत नाही तर रुंदी, खोली, व उंची ही असली पाहिजे. माणूस जन्माला येतो परंतु माणुसकी निर्माण करावी लागते. माणुसकी उराशी बाळगून मातृ हृदय घेऊन जगणारे व्यक्तिमत्व फारच कमी पाहावयास मिळतात. पण शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना सदैव विद्यार्थ्यांचे हित जपणारे प्रवाही साहित्यिक म्हणून विठ्ठल बरसमवाड यांचा या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो. आई-वडिलांनी हाडाची कांड करून आपल्यावर संस्कार करत घडविले त्यांचे ते संस्कार व श्रम वाया न जाऊ देता त्यांचे चीज करणारा हा माणूस आहे. तुमच्याकडे किती श्रीमंती आहे याकडे बघून तुमच्याजवळ तो येत नाही तर तुमच्याकडे किती माणुसकी आहे. तुम्ही इतरांच्या सुखदु:खात किती मनापासून सहभागी होता. हे त्यांनी जाणले आहे.मानवी जीवन हे अमूल्य आहे. त्यांनी धार्मिक क्षेत्रातील ही काही महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी ही त्यांचे थोडेफार योगदान आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात ते सक्रिय सहभागी असतात. समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना घेऊन त्यांना त्याच्या क्षेत्रात मदत करतात. शेकडो लेख लिहिण्यासाठी तन-मन धन अर्पावे लागते. एक बार ते धन कमी असेल तरी चालेल पण मन मोठे असावे लागते. अशी माणसे समाजात फार दुर्मिळ झाली आहेत. त्यांच्या अंगी असलेला नम्र भाव खरोखरच वाखण्याजोगा आहे. बोलताना किंवा लिहिताना ते नेहमी आदरणीय सर अशा शब्दाचा वापर करतात.*नम्र झाला भुता। त्यांनी कोंडीले अनंता।।* या ओवीची मला आठवण होते. मोकळे मन, रसाळ वाणी व गुणसंपन्न असे ते वेगळे व्यक्तिमत्व आहे. जे मिळाले नाही त्यांच्याविषयी खंत न बाळगता जे मिळाले ते आनंदाने स्वीकारतात. शिक्षक हा बहुगुणी व कलाकार असावा. आपल्यातील कला गुण विद्यार्थ्यांत रुजवणे ही शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. लेखन, वाचन, चिंतन हे शिक्षकांच्या अंगी असणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळेच ते नेहमी विद्यार्थी प्रिय झाले. विद्यार्थ्यांतील उपजत गुणांना सोबत घेऊन त्यांच्यात भर घालून त्यांना पुढे आणणे हा त्यांचा छंद आहे. झाडे नुसती लावून चालत नाही तर त्यांना खत पाणी घालून मोठे करावे लागते. तसे गुरुजी सर्वांकडे लक्ष देतात. विद्यार्थ्याबद्दल त्यांच्या मनात नेहमी आदराचे स्थान आहे. कोणतीही फळे आयती पदरात पडलेली माणसं नशीबवान असतात. परंतु येथे मात्र प्रत्येक संकटांना तोंड देऊन प्रतिकूल परिस्थितीला छेद देऊन आपले उज्वल वर्तमान घडविण्याचा ते प्रयत्न करतात. 

चार पैसे हातात आले म्हणून स्वभावात बदल होऊ दिला नाही. आणि ते कधी जाणवणारी नाही. व्यवहारात याचा कुठेही लवलेश जाणवत नाही.प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, सहानुभूती, माणुसकी विश्वास हे फक्त साहित्यामधूनच वाचायला मिळत आहे. मोगऱ्याचे फुल ओंजळीत घेतले की त्याचा गंध मनाला शरीराला प्रसन्न करून जातो. काही माणसाचा सहवासही अशाच मनाला प्रसन्नता देणारा असतो. माझ्या छोट्याशा साहित्य प्रवासात मला अशी अनेक माणसे भेटली. त्याच प्रथम स्थानी यांचे नाव घ्यायला मी विसरत नाही. गोड वाणी, विनम्र वागणे, कमी बोलणे, काम जास्त करणे म्हणजे शालीनता खऱ्या अर्थाने होय. शांततेचा संदेश देणारे महान व्यक्तिमत्त्वाचे विचार आणि आचार त्यांनी आपल्यामध्ये रुजविले आहेत. लेखन सातत्याबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आजही ते सातत्याने दररोज काही ना काही लिखाण करीतच असतात. लिखाण करून ते थांबत नाहीत तर लेखनासोबतच अनेक साहित्य संमेलनाला हजेरी लावतात. 

शिक्षणाला तिसरा डोळा मानले जाते. हाच डोळा शिक्षणाला महाशक्तीत परावर्तित करतो हे त्यांनी जाणले. ज्यांच्याकडे ही दृष्टी आहे त्यांनी निरक्षरांना नेहमीच मदत केली त्यांचा स्वभाव भिडस्त मायाळू आणि सतत माणुसकी जपणारा आहे त्यांचे व्यक्तिमत्व सतत प्रज्ञाशील आणि करुनीच्या दिशेने जाणार ठरलं त्यांनी शिक्षणाची खरी शक्ती आपल्या विद्यार्थ्यात उतरवली, शिक्षणातून परिवर्तन घडवून आणण्याची दिशा देणारे नवे क्षिंतिज उघडून दिले. 

त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनाचे बोट धरून ज्ञान प्रबोधन आणि यशोधनाची सहल घडवून आणली. मानवी जीवनाला अधिक चांगले जीवन जगण्याचे स्वप्न दिले. जीवनात चांगले काय? आणि वाईट काय? याचा विवेक चांगले शिक्षणच जागवते. आयुष्यभर शिक्षणाचे आणि मानवी जीवन जगताना आलेल्या गोड कडू क्षणाचे आयुष्य ज्यांनी वेचले असे कर्तव्य कठोर माझे मित्र म्हणजे विठ्ठल बरसमवाड हे आहेत.समस्या, दुःख प्रश्न आणि कोणत्याही लहान मोठ्या संकटापुढे ते वाकणार नाहीत. याबद्दलची सद्सदविवेकबुद्धी कायम जागरूक ठेवून जगण्याची आहार विहार करण्याची त्यातून मानवी हितसंबंध जपण्याची सद्बुद्धी त्यांना मिळो. अशी प्रांजल अपेक्षा व्यक्त करते. 

ग्रामविकासाच्या ध्येयाने झपाटल्याने ,शिक्षणातून जनहित साधता येते. हे त्यांनी ओळखले. आपण केलेल्या कामाचे आपल्याला समाधान मिळालं पाहिजे. 

असे ते नेहमी इतरांना सांगतात.ज्यांनी माती वर पाय ठेवून आकाश काबीज केले. नि:स्वार्थी कार्याची सहनशीलता पारदर्शी विचार, समाजाभिमुख नेतृत्व,जनहिताचे निर्णय घेण्याची क्षमता,सदैव विद्यार्थी हित, परिवर्तनशील उपक्रम, साधी राहणी, प्रामाणिक वर्तन,सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे असे अनेक वैशिष्ट्ये सांगता येतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन ते पुढे आले. विद्यार्थ्यांना परीक्षेचे तंत्र शिकवून पुस्तकी अभ्यासातील गुणवत्ता वाढीबरोबरच आयुष्यात द्याव्या लागणा-या अनेक परीक्षांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी कणखर राहिले पाहिजे. त्यासाठी विवेक बुद्धी जागृत ठेवा. सुप्त गुणांना वाव द्या. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा, समानतेने चला, सत्याच्या बाजूने नेहमी राहा. परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही याची सतत जाणीव असू द्या. असे ते नेहमी विद्यार्थ्यांना सांगतात. समाजासाठी वादळातील दिवा होऊन तेवत राहणारे विठ्ठल बरसमवाड हे सध्या महात्मा गांधी विद्यालय, येळी,ता .पाथर्डी येथे कार्यरत आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आज समाजात एखाद्या हिऱ्याप्रमाणे चमकत आहेत.त्यामुळे शिक्षणात किती शक्ती आहे हे त्यांच्या लिखाणा वरून कळते. आयुष्यात त्यांनी कोणाचीही पाठराखण केली नाही.किंवा चुकीच्या माणसांच्या सोबत राहिले नाहीत. सारखं ते विद्यार्थी हे शिक्षण व्यवस्थेचे केंद्रबिंदू मानून सतत कार्य करीत आहेत.

शिक्षक हा शैक्षणिक चळवळीचा कार्यकर्ता असतो. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव पडलेला दिसून येतो.राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे. 

यांच्या विचारधारेने चालतात.ते इतिहास विषयाचे अध्यापन करतात. त्यामुळे त्यांनी अनेक महापुरुषांची चरित्र वाचले आहेत. त्या सर्वांचा प्रभाव त्यांच्या मन:पटलावर झालेला आहे. त्यामुळे ते सारखं लिहीत असतात. नेहमी ते सकारात्मक बोलतात. कोणाचीही थट्टा, चेष्टामस्करी तर त्यांना अजिबात माहिती नाही. त्यांनी लिहिलेले आठ ग्रंथ खरोखरच समाजाला दिशादर्शक व मार्गदर्शक आहेत. संत साहित्य लिहून वारकरी संप्रदायाची ज्योत त्यांनी अखंड तेवत ठेवली आहे.

विद्यार्थ्यांसाठी सुविचार संग्रह काढून विद्यार्थ्यांच्या मनात चैतन्याची बाग फुलविली आहे.स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी इतिहासातील हिरे-मानके, क्रांतीरत्ने क्रांतीपर्व,मराठी ज्ञानपीठाचे मानकरी, असे दर्जेदार ग्रंथ लिहून समाजातील होतकरू, गरीब, पीडित यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे कार्य सध्या ते करत आहेत. लेख लिखाणाच्या माध्यमातून त्रिशतक ( 304) लेख पूर्ण केले. अहमदनगर आकाशवाणी वरून त्यांचे कथाकथन (दारिद्र्य कथा) कार्यक्रम झाले. अनेक उच्चविद्याविभूषित लोकांच्या संपर्कात राहणे.त्यांच्याशी हितगुज करणे,त्यांना नेहमी आवडते. त्यामुळे ते नेहमी महान विभूतीना भेटतात. भारतातील अनेक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र, गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळांना पर्यटक म्हणून भेटी दिल्या.नेहमी ते आपल्या गुरुजनांचा आई-वडिलांचा सन्मान करतात. ते विठूमाऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून अनेक उपक्रमाद्वारे सामान्य जनतेत ,विद्यार्थ्यांत स्वाभिमान निर्माण करतात.गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांचा ते प्रासंगिक दिनी सत्कार करतात.

आजतागायत त्याचे 200 व्याख्याने सामाजिक, शैक्षणिक विषयांवर झाली आहेत. त्यामुळे त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची फार आवड आहे. दिसलेले कागद उचलून त्याचे वाचन करून त्यातील चांगले वाक्य ते लक्षात ठेवता. त्यामुळे वाचक प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. 

अशा या ग्रंथात रमणाऱ्या जिद्दी आणि परिश्रम करणा-या विद्याधीशाचे आज सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. त्यासाठी आपल्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा देत आहोत.

शब्दांकन

अभिषेक बकेवाड हिमायतनगर

प्रदेश अध्यक्ष युवक महाराष्ट्र,नवी दिल्ली

जिल्हा अध्यक्ष युवक गोल्ला गोलेवार यादव महासंघ नांदेड.

संपादक लोकतंत्र न्युज लाइव्ह महाराष्ट्र.

Share This Article
error: Content is protected !!