माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर – दि. ०३ ऑक्टोबर “या माहूर गडाची शान आई तुझं देऊळं।
फुलून गेले भक्तांनी रान आई तुझं देऊळं।।” अशी धार्मिक महत्ता असलेल्या राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मुळ पिठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावरील श्री रेणुकादेवी मंदिरात आज आश्विन शुद्ध प्रतिपदा गुरुवार ०३ ऑक्टोबर रोजी सकाळी शुभमुहूर्तावर देवीची महाआरती करून महानैवेद्य दाखवून संस्थानचे पदसिद्ध अध्यक्षा तथा प्रमुख जिला व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या हस्ते तथा सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली,कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाला हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. पूजारी भवानीदास भोपी,शुभम भोपी यांनी धार्मिक पूजाविधी पार पाडली. यावेळी विश्वस्त विनायक फांदाडे, चंद्रकांत भोपी,संजय कान्नव,दुर्गादास भोपी, बालाजी जगत, अरविंद देव आदींची उपस्थिती होती.

अश्विन शुद्ध प्रतिपदा दि. ०३ ते१२ ऑक्टोबर विजयादशमी या कालावधीत नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार असून,माहूरगडावर आज मोठ्या भक्तिभावाने पूजाअर्चा,पूजाविधी करून अत्यंत धार्मिक वातावरणात देवीसमोर संस्थान अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या हस्ते सकाळी १०:५० पासून सुरू झालेल्या शुभमुहूर्तावर घटस्थापना करण्यात आली.देवीची महापूजा माजी विश्वस्त भवानीदास रेणुकादास भोपी यांनी केली. तसेच शुभम संभाजी भोपी मुख्य पुजारी यांनी पूजा आरती करून गाभाऱ्यातील सजावट केली. घटाला पूजन व पहिली माळ अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर व सचिव सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कुमारिका पूजनही करण्यात आले व देवीचा छबिना काढण्यात आला. परिवार देवतेचे पूजन संभाजी शिवाजी भोपी व अमित किरण भोपी ह्यांनी घट स्थापना पूजा नैवेद्य आरती केली. दुपारी पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण करून देवीच्या पाच महा आरत्या करण्यात आल्या. उपस्थित भक्तांनी बंजारा नृत्य सादरीकरण केले.सर्व भाविकांना अन्नदान महाप्रसादास आरती नंतर सुरवात करण्यात आली.
आज पंचमहायोगात नवरात्रीला सुरुवात झाली आहे. यावेळी तृतीया तिथी दोन दिवस चालणार आहे. या तिथीतील विसंगतीमुळे अष्टमी आणि महानवमीची पूजा ११ तारखेला होणार आहे. शनिवार १२ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा होणार आहे. तारखेत तफावत असली तरी देवीपूजेसाठी पूर्ण नऊ दिवस उपलब्ध असणार आहेत.
आज नवरात्रीला पर्वत, शंख, पारिजात, बुधादित्य आणि भद्रा या पाच राजयोगात सुरुवात होत आहे. या पंचमहायोगांमध्ये घटस्थापनेमुळे देवीच्या पूजेचे शुभ परिणाम आणखी वाढतात, असे ज्योतिषी मानतात.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाची (कलश) स्थापना केली जाते. याला माता की चौकी उभारणे असेही म्हणतात.
माहूरगडावरील नवरात्र महोत्सवात देशभरातील लाखो भाविक मातेच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.मंदीर संस्थान प्रशासन व तालुका प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासन यांनी उत्तमरित्या सूत्रबद्ध पद्धतीने यात्रा नियोजन केले असून,भाविकांच्या सेवेसाठी सुलभ दर्शन, पाणी, आरोग्य, सावली, वाहन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था पोलीस प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था भक्कमपणे उभारण्यात आली आहे.