आज ललिता पंचमीला आणि सप्तमी-अष्टमी व नवमीस माहूरगडावर भाविकांची मोठी मांदियाळी उसळण्याची शक्यता
नांदेड जिल्हा प्रतिनिधी / बजरंगसिंह हजारी
दि.०७ ऑक्टोबर : अश्विन शुद्ध प्रतिपदा ०३ ऑक्टोबर पासून माहूरगडावरील श्री रेणुकादेवी मंदिर संस्थान येथे घटस्थापनेने नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली असून,१२ ऑक्टोबर विजयादशमी पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात भाविक भक्तांना देवीच्या दर्शनासाठी मंदीर प्रशासनाच्या वतीने सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.नवरात्र काळात देवीच्या दर्शनाची वेळ ही सकाळी ०५ ते रात्री १० अशी वाढवून देण्यात आली असली तरी शेवटच्या भाविकाचे दर्शन होईपर्यंत मंदीर हे उघडे राहणार असल्याने श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी शांततेत मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि मंदीर प्रशासन,महसूल प्रशासन व यात्रा नियोजन करणारे सर्व संबंधित प्रशासनास सहकार्य करावे!” असे नम्र आवाहन श्री रेणुकादेवी संस्थान,माहूरगड, विश्वस्त समितीच्या वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी भाविक भक्तांना केले आहे.
*माहूरगडावरील श्री रेणुकादेवी मंदीर संस्थान येथे घटस्थापनेनंतर कुमारिका पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असून, त्यानंतर छबिना मिरवणूक काढली जाते.
छबिना म्हणजे परिवार देवतांचे पूजन होय.दरम्यान चतुवेद पारायण, सप्तशती १००पाठ पूर्ण झाल्यानंतर होम हवन केला जातो. चारही वेदांचे पारायण या दिवशी देवीस ऐकविले जाते.यासाठी प्रत्येक वेदाचे दोन दोन गुरुजी नियुक्त केलेले असतात.
*सप्तमीला संस्थानच्या वतीने किल्ल्यातील महाकाली देवी गडावर जाऊन देवीला महावस्त्र, महानैवेद्य अर्पण करून पूर्व परंपरेनुसार अष्टमीच्या हवनाची परवानगी मागितली जाते.महापूजा केली जाते.या नवरात्रात सप्तमी आणि अष्टमी दोन्ही योग एकाच दिवशी आलेले आहेत.
*नवमीच्या दिवशी पूर्णाहूतीने हवनाची सांगता होते. याच दिवशी घटोत्थापन केले जाते. म्हणजे घटाच्या माळा पूर्ण वर उचलल्या जातात.
*पूर्णाहूती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विजयादशमी दसरा संस्थान तर्फे मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जातो. यावेळी रेणुकादेवी पूत्र भगवान परशुरामाची वाजतगाजत पालखी दक्षिणेकडील पर्वतावरील वरदायिनी मातेच्या मंदिरात जाते आणि भगवान परशुराम त्या ठिकाणाहून आपटारुपी सोनं पालखीतून घेऊन येतात व मातेस अर्पण करतात.
यावेळी पालखीसमोर ‘कोहळा’ बलिदान केले जाते. यानंतर सुवासिनी महिला भगवान परशुरामाचे औक्षण करतात.
परशुरामाची अभिषेक पूजा करून आपटारुपी सोनं मातेला अर्पण करतात.त्यानंतर उपस्थित आप्तस्नेहीयांना सोनं देऊन एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात.
*असे सांगत विश्वस्त चंद्रकांत भोपी पुढे म्हणाले कि,खऱ्या अर्थाने कोजागरी पौर्णिमेला या महोत्सवाची सांगता होते.या दिवशी सुद्धा रात्रीला धार्मिक नृत्य, गायन, वादन, संगीत कला कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.अशीही माहिती विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी बोलताना दिली.
————————-
*भाविकांना सोईसुविधा*
नवरात्र काळात गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्री रेणुकादेवी मंदीर संस्थान व यात्रा नियोजन तालुका प्रशासनाच्यावतीने सर्व प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
*संस्थान तर्फे-*
*पायऱ्यांवर ठिकठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याचे ॲरो वॉटर व्यवस्था.
*महिला व पुरुषांना स्वतंत्र स्वच्छता गृह
*आरोग्य सुविधेसाठी आरोग्य विभागाचे रेणुकादेवी मंदीर, पायऱ्या,दत्त शिखर,अनुसया मंदीर याठिकाणी आरोग्य कॅम्प
*यासह संस्थानचा दवाखाना हा २४ तास कार्यरत राहणार आहे.
*१०८ ॲम्बुलंस, संस्थानचे ॲम्बुलंस व इतर ॲम्बुलंस आणिबाणी परिस्थितीसाठी सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.
*तर उंच गडावरील अरुंद व घाटवळणाचे नागमोडी रस्ते पाहता पोलीस प्रशासनाने गडावर जाण्यासाठी खाजगी वाहनांना यात्राकाळात बंदी केली असून, ट्राफिक जाम टाळण्यासाठी शहरातील यात्राकालीन पार्किंग स्थळी भाविकांनी आपली वाहने उभी करून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे गडावर दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था माहूर एसटी आगाराने केली असून,त्यासाठी मुबलक प्रमाणात जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
————————-
*आज ललिता पंचमी*
आज सोमवार दि.०७ रोजी ललित पंचमीला गडावर देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध कलावंत आपली कला मातेचरणी अर्पण करण्यासाठी श्री रेणुकादेवी दरबारी हजेरी लावतात.रात्रभर धार्मिक नृत्य,गीत, गायन, संगीत,वगैरे विविध कलेचे सादरीकरण करणारी संगीत रजनी संस्थान तर्फे आयोजित करण्यात येत असते. देशातील नामवंत कलाकार आपली कला श्री चरणी अर्पण करून कृतकृत्य होतात.
*दरम्यान, काल रविवारी शासकीय सुट्टीचा दिवस असल्याने माहूरगडावरील श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड मांदियाळी गडावर उसळली होती.गड पायथ्यापासूनच नव्हे तर अगदी दक्षिणेकडील दत्त शिखर रोडच्या जवळपास अर्धा किलोमीटर दूर अंतरापासून भाविकांच्या गच्च आणि लांबच्या लांब रांगा लागल्याच्या दिसून येत होत्या. जवळपास चार तासांचा वेळ दर्शनासाठी लागत होता.
गुरुवार ०३ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेनंतर दुसऱ्या माळेला शुक्रवार दिवस हा देवीचा वार असल्याने पहिल्या माळेच्या तुलनेत देवीच्या दर्शनासाठी भाविकांची थोडीफार गर्दी वाढली होती.तर शनिवारी तिसऱ्या माळेला दुसऱ्या दिवशी रविवार हा सुट्टीचा दिवस येत असल्याने चौथ्या माळेला देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा जनू जनसागर उफाळून आल्याने गडावर दृष्टी जाईल तिकडे ‘उदो ग अंबे उदो!’ चा गजर सह्याद्री पर्वतरांगेतील रामगड किल्ला परिसरात घुमत होता.
अख्खे ब्रम्हांड मातेच्या दर्शनाच्या ओढीने भक्तीसागरात न्हाऊन निघाले होते.लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी शहरामार्गे गडावर दाखल झाल्याने मंदीर प्रशासन व तालुका नियोजन प्रशासनाचा प्रचंड तान वाढला होता.यातूनही माताराणी श्री रेणुकादेवीने प्रशासनाला कृपाशीर्वादाने तारत सर्व भक्तांना आपले दर्शन देऊन कृतकृत्य केल्याने भाविक भक्त समाधानी होऊन परतीच्या प्रवासाला सुखरूप घरी जात असल्याचे दिसून येत होते.
आज सोमवारी ललिता पंचमी असून, नवरात्रातील प्रमुख तिथी पैकी समजण्यात येते. आजतर देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध कला अंगी असलेले अनेक नामवंत कलाकार माहूरगडावर मातेच्या दरबारात हजेरी लावतात.धार्मिक नृत्य, गायन, वादन, संगीत अशा विविध कला ते मातेच्या चरणी सादर अर्पण करतात. त्यामुळे देवी च्या दर्शनासाठी आलेले भाविक ललिता पंचमी निमित्ताने संस्थानच्या वतीने आयोजित रात्रभर जागरण करत चालणाऱ्या धार्मिक संगीत कला रजनीचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थिती लावतात. त्यामुळे कालच्या पेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी आज ललिता पंचमीला होण्याची शक्यता मंदीर प्रशासन व यात्रा नियोजन तालुका प्रशासनाने वर्तवली आहे.
————————-
*गर्दी आणखी वाढणार*
*अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त समिती,मंदीर प्रशासन
जय्यत तयारीनिशी सज्ज असून,सातव्या-आठव्या व नवव्या माळेला या तिथीच्या धार्मिक महत्त्वानूसार नवरात्रातील उच्चतम भाविक भक्तांची अलोट गर्दी माहूरगडावर उसळण्याची शक्यता गृहीत धरत सर्व सोईसुविधेसह सज्ज झाले आहे. सचिव तथा सहा.
जिल्हाधिकारी मेघना कावली,उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव हे पदसिद्ध विश्वस्त आणि मंदिरसंस्थान विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय कान्नव,विनायक फांदाडे,बालाजी जगत, दुर्गादास भोपी, अरविंद देव, जोशी व्यवस्थापक योगेश साबळे हे भाविकांना मातेचे दर्शन सुलभ आणि सोईसुविधेसह कसे अधिक सुकर होईल यासाठी दिवसरात्र झटत आहेत.एकंदरीत काल रविवारी उसळलेली भाविकांची अलोट गर्दी आजपासून आणखी वाढत जाऊन सप्तमी व अष्टमी एकाचवेळी आल्याने ह्या दिवशी व नवमीस माहूरगडावर श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड मोठ्या गर्दीची मांदियाळी उसळण्याची दाट शक्यता प्रशासनासह जाणकारांनी वर्तवली आहे.