माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर – दि.१८ऑक्टोबर हे माते!शेतीव्यवसायाला भरभराट येऊ दे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांसह सर्वांना समृद्ध कर,सुखी ठेव! अशी प्रार्थना करत राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक किनवट/माहूर मतदारसंघातील आमदारासह महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून येऊ दे आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येऊ दे! अशा मागणीचे साकडे राज्याचे शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्री दीपक वसंत केसरकर यांनी आज माहूरगडावरील श्री रेणुका देवीच्या चरणी केले.शुक्रवार दिनांक १८ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा.च्या दरम्यान मंत्री केसरकर यांनी श्री रेणुकादेवीच्या दरबारात हजेरी लावून मातेचे दर्शन घेत महाआरती केली.यावेळी त्यांचे सोबत देगलूरचे माजी आमदार गोविंद केंद्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी मुख्य पूजारी शुभम भोपी,अमित भोपी, संभाजी भोपी यांनी धार्मिक पूजाविधी पार पाडले.
तदनंतर,शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात मंत्री केसरकर यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल वाघमारे, नगरसेवक सागर महामुने तर शिवसेना (एशिं) शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी यांनी शॉल, पुष्पहार व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार सन्मान केला.
यावेळी बोलताना मंत्री केसरकर यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक किनवट विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत उभा राहणाऱ्या महायुतीच्या उमेदवारास बहुमताने निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.त्यासाठी आधी दिवाळी व त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर महादिवाळी साजरी करुन या! असा आत्मविश्वास व्यक्त केला.आणि हे करण्यासाठी सर्वांनी आपल्या उमेदवारास जिवाचे रान करून भरघोस मते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत ! असेही सूचनावजा आवाहन शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.