महाराष्ट्रात बंजारा समाजाची भूमिका निर्णायक ठरणार- विशाल पवार
देगलूर/ प्रतिनिधी,नागेश पलपवार
देगलूर – भाजपचे प्रदेश सचिव व बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड गेल्या तीस वर्षांपासून भाजपमध्ये निष्ठापूर्वक सक्रिय असून, लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील वाडी, तांड्यापर्यंत भाजप पोहोचवण्याचं काम देविदास राठोड यांनी केले असून, भाजपने मात्र कायम त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. वेळोवेळी विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन देऊन ऐनवेळी त्यांना भाजपने डावळले असल्यामुळे नाराज असलेले भाजपचे नेते देविदास राठोड हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, बंजारा क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांची राज्यव्यापी बैठक दि. २० ऑक्टोबर रोजी नांदेड येथे आयोजित केली आहे, अशी माहिती बंजारा क्रांती दलाचे प्रवक्ते तथा माजी पंचायत समितीचे सदस्य उत्तम चव्हाण यांनी दिली.
बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून समाजकारणातून राजकारणात देविदास राठोड सक्रियपणे महाराष्ट्रभर काम करत आले आहेत. तत्कालीन केंद्रीय ग्रामविकासमंत्री, लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात भाजप वाडी, तांडा पर्यंत नेण्याचं काम भाजपचे प्रदेश सचिव देविदास राठोड यांनी केले आहे.
स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतरही त्यांच्या पाश्चात भाजप नेत्या आमदार पंकजाताई मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एकनाथराव खडसे, विनोद तावडे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, माजी मंत्री व खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत भाजपचे काम करत राहिले. त्यांचा फायदा कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातही भाजपला झाला. पक्षाचे जेव्हा जेव्हा आदेश आले. तेव्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देविदास राठोड यांनी जीवाचे रान करून भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे काम केलं. गेल्या ३० वर्षांपासून भाजपमध्ये एकनिष्ठेने सक्रिय असताना सुद्धा भाजपने त्यांना राजकीय फायदा कुठेच करून दिला नाही. वेळोवेळी त्यांना
विधान परिषदेवर घेऊ असे आश्वासित करून त्यांना प्रत्येक वेळी भाजपने व भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी देविदास राठोड यांना डावळण्याचं काम केल्यामुळे भाजप नेते देविदास राठोड हे प्रचंड नाराज आहेत. काल परवा झालेल्या राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारांमध्ये त्यांचा समावेश न झाल्यामुळे राज्यभरातील बंजारा समाजाचे कार्यकर्ते आणि बंजारा क्रांती दलाचे पदाधिकारी यांच्यात असंतोष पसरला आहे. देविदास राठोड यांनी ठोस निर्णय घेतलाच पाहिजे याकरिता २० ऑक्टोबर रोजी नांदेड येथील गुरुद्वारा सभागृहात राजव्यापी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
सदरील बैठक बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड यांच्या नेतृत्वाखाली होणार असून या बैठकीसाठी राज्यातील बंजारा समाजाचे महंत त्याचबरोबर माजी खासदार हरिभाऊ राठोड, बंजारा क्रांती दलाचे युवकाचे प्रदेश उपाध्यक्ष विद्यानंद राठोड, क्रांती दलाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष सुंदरसिंग जाधव, सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस देगलूर तालुक्यातील बंजारा समाज हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विशाल पवार यांनी केले आहे.