नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड :किनवट विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी जेमतेम दोनच दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना उमेदवार फेरबदलीचा नवीनच राजकीय ट्विस्ट आला असून,वंचित कडून उमेदवारी जाहीर झालेले माहूर तालुक्यातील प्राध्यापक विजय खुपसे यांचे वंचित प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर यांनी तिकीट कापून नव्याने त्याजागी किनवट तालुक्यातील डॉ.पुंडलिक आमले माळबोरगावकर यांना उमेदवारीचे तिकीट दिले असल्याने किनवट विधानसभा निवडणुकीत उमेदवार निश्चितीत मोठी राजकीय उलथापालथ होऊन नाट्यमय घडामोड झाली आहे.
किनवट विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यामध्ये इतर राजकीय पक्षाकडून त्यांच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याआधी वंचित बहुजन आघाडीने प्रा.विजय खुपसे यांचे नाव सर्वात आधी जाहीर करुन निवडणुकीच्या मैदानात प्रस्थापितांशी दोन दोन हात करत टक्कर देण्यासाठी आपण तैय्यार असल्याचा ओपन चॅलैंज रुपाने बॉंब फोडला होता.तो आता दिवाळीपूर्वीचा फुसका बार निघाला असून, पेटवण्याआधीच (नामनिर्देशन पत्र भरण्याआधीच) बॉंबचा धमाका होणार नाही याची पश्चातबुद्धी प्रचिती आल्याने आंध या आदिवासी जमाती मधील प्राध्यापक उमेदवाराऐवजी आता नव्याने त्याच समाजातील एका डॉक्टर महाशयांना वंचितच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांनी उमेदवारी जाहीर करुन नाट्यमय राजकीय उलथापालथ करुन निवडणुकीस वेगळे वळण दिले आहे.
प्राध्यापक उमेदवाराच्या अभ्यासपूर्ण बोलभाषणाने मतदार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकडे वळणार नाहीत असा महाभारतातील दिव्यदृष्टी लाभलेल्या संजय प्रमाणे बहुधा वंचितच्या प्रदेश अध्यक्षांना लवकरच साक्षात्कार झाला असावा आणि म्हणून त्यांनी जनसामान्यांच्या आजारावर इलाज करणाऱ्या एका डॉक्टर ला उमेदवारी देऊन यावर रामबाण उपाय आणि इलाज दोन्ही साधण्याचा नवीनच राजकीय डावपेच आखला असल्याचे दिसून येत आहे. आपल्या वैद्यकीय व्यावसायादरम्यान भल्याभल्यांच्या आजाराचे निदान करत इलाज व उपचार करणारे डॉक्टर पुंडलिक आमले हे स्वत:च ‘राजकारणीया’ नावाच्या राजकीय रोगाने झपाटल्यावर वंचितचे उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी मायबाप मतदार जनता आता मतदानरुपात दस्तुरखुद्द डॉक्टरांनाच कोणती औषधी प्रिस्क्रिप्शन देतात यावर त्यांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे.
तर याउलट ते निवडून न आल्यास याचे परिणामाने ते कोणत्या
प्रस्थापीत उमेदवारास विजयसंजिवनी देतात आणि कोणाला सलाईन लावतात हे पाहणे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे.