सचिन नाईक यांची धांसू एण्ट्री;प्रदीप नाईक यांच्यासाठी धोक्याची घंटा
आज शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी श.प.चे प्रदीप नाईक दाखल करणार उमेदवारी अर्जखा ,आमोल कोल्हे राहणार उपस्थित
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड : किनवट विधानसभा मतदारसंघ-८३ निवडणुकीसाठी दि.२४ ऑक्टोबर रोजी प्रथम नामनिर्देशन अर्ज भरल्यानंतर आता महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.भीमराव केराम यांनी तर सचिन नाईक मित्रमंडळाकडून सचिन नाईक यांनी सोमवार दि.२८ ऑक्टोंबर रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपापला उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी मेघना कावली यांच्याकडे दाखल केला.यावेळी आ.केराम यांच्या समर्थनार्थ उसळलेल्या प्रचंड जनसमुदायातून ‘भारत माता की जय,पंतप्रधान नरेंद्र मोदी की जय, आ. केराम तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणांनी अख्खे किनवट शहर दणाणून गेले होते.तर आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 29 तारखेला महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार प्रदीप जाधव नाईक हे खा.अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत हम किसेसे कम नहीं म्हणत मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सोमवार दि.28 ऑक्टोबर रोजी दुपारी महायुतीकडून भाजपाचे आमदार भीमराव केराम यांनी किनवट येथील हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा मैदानापासून निघत शहरातील मुख्य मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जात प्रचंड रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करत सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी मेघना कावली यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आपले लाडके नेते आ.केराम यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्यानिमित्ताने उपस्थित झालेल्या त्यांच्या हजारों समर्थकांनी सकाळपासूनच प्रचंड गर्दी केली होती.लवकरच त्याचे रूपांतर एका विशाल रॅलीत झाले.यावेळी आदिवासी महिलांसह बंजारा समाजाच्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.विशेष म्हणजे बंजारा समाजातील महिलांनी पारंपारिक वेशभूषेत मोठ्या उत्साहाने रॅलीत भाग घेतला.अनेक पथकाने केलेल्या परंपरागत आदिवासी नृत्याने रॅलीला अधिक रंगत आणली.या रॅलीत आ.केरांमाच्या लाडक्या बहिणींप्रमाणेच लाडक्या भाऊरायांची उपस्थितीदेखील लक्षणिय अशीच होती.
यावेळी भाजपा नांदेड जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख,सुधाकर भोयर,
वैजनाथ करपुडे पाटील,आनंद मच्छेवार,बाबूराव केंद्रे,दिनकर चाडावार,सुनील पाटील,बालाजी आलेवार,ॲड.अविनाश राठोड,संदीप राठोड,प्रा.राजेंद्र केशवे,भाजपा माहूर तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर,संजय राठोड,पुरुषोत्तम लांडगे,फिरोज पठाण,तालुकाध्यक्ष अमित राठोड (रा.काँ.अजितदादा गट ),नगरसेवक सागर महामूने,जेष्ठ नेते अनिल वाघमारे,तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे,विजय आमले,विनोद सूर्यवंशी,बालाजी गेंटलवार,संतोष चनमनवार,स्वागत आयनेनीवार,
मुसाखान,सागर शिंदे,पद्मा गिऱ्हे,राधा उपलेंचवार यांचेसह विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्व घटकपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारसंघातील हजारों समर्थकांची उपस्थिती होती.
दरम्यान, याआधी सचीन नाईक मित्रमंडळाकडून सचीन जाधव (नाईक) यांनीही अनेक समर्थकांसह कलावती गार्डन येथून रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालय,किनवट येथे सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी मेघना कावली यांच्या कडे दाखल केला.
किनवट विधानसभेत गत निवडणुकीतील विजेते भाजपाचे विद्यमान आ.भीमराव केराम विरूद्ध मागील निवडणुकीतील दोन क्रमांकावर राहत पराभूत झालेले तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उभे असलेले प्रदीप जाधव नाईक या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धीमध्येच यावेळीही दुहेरी लढत होण्याची दाट शक्यता राजकीय निरीक्षकांकडून वर्तविण्यात येत असतानाच आता सचिन नाईक मित्रमंडळाकडून बंजारा समाजातील सचिन जाधव नाईक यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत किनवट विधानसभा निवडणुकीत धांसू एण्ट्री करत जोरदार शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज भरल्याने किनवट विधानसभेच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट आला असून, मोठी रंगत निर्माण झाली आहे. किनवटच्या मुख्य राजकारणातील दोन बब्बर शेर मधील राजकीय अस्तित्वाच्या झुंजीत सचीन नाईक सारख्या तरणाबांड वाघाने झेप घेतल्याने आता ही लढत तिरंगी होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून वर्तविण्यात येत आहे. परिणामी, सचिन जाधव नाईक यांच्या जोरदार एंट्री मुळे प्रस्थिपितांमध्ये भगदड माजली असल्याचे दिसून येत असून, “अब आया उंट पहाड़ के नीचे,देखना है कि,किस करवट बैठेगा” अशा स्वरुपाच्या कयासात्मक प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहेत. सचिन नाईक व प्रदीप नाईक हे दोघेही बंजारा समाजातील असल्याने सचिन नाईक यांची उमेदवार म्हणून एण्ट्री होण्याआधी बंजारा समाजातील मुख्य नेता म्हणून प्रदीप नाईक यांच्यासाठी बंजारा मतांचे ध्रुवीकरण होऊन त्यांना याचा निश्चित फायदा होईल असे राजकीय निरीक्षकांकडून अंदाज बांधण्यात येत होते. परंतु आता हे राजकीय चित्र चक्क बदलण्याचे संकेत असून, सचिन नाईक यांच्या जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सचीन नाईक मित्रमंडळाकडून उमेदवारी अर्ज भरण्याने बंजारा मतांची सरळ विभागणी होऊन मतांचे ध्रुवीकरण यामुळे टळणार असल्याने आज दि.२९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून आपला उमेदवारी भरणाऱ्या प्रदीप जाधव यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे राजकीय वर्तुळातून ऐकावयास मिळत आहे.
याउलट परिस्थिती महायुतीच्या उमेदवाराची असल्याचे दिसून येत असून, सचिन नाईक केराम यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या फायद्याचे कि,अवघड जागचे दुखने ठरणार याचे उत्तर आजतरी काळाच्या आड लपलेले आहे. सुरुवातीला वंचित बहुजन आघाडी कडून सर्वप्रथम उमेदवारी घोषित झालेले प्रा.विजय खुपसे यांचे तिकीट कापून प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तोंडावर पश्चातबुद्धी बॅकफूटवर जात ऐणवेळी उमेदवार बदलून डॉ.पुंडलिक आमले यांना उमेदवारी दिल्याने राजकारणाचा फारसा अनुभव नसलेल्या नवख्या आदिवासी समाजातील उमेदवारास मतदारसंघातील आदिवासींसह इतर समाजातील जनता कितपत जवळ करतील या प्रश्नाचे उत्तर निवडणुक निकालानंतच मिळणार आहे.यामुळे मात्र महायुतीचे उमेदवार आ.केराम यांचा रस्ता आज तरी क्लियर झाला असल्याचे राजकीय ठोकताळे बांधले जात आहेत.