ग्राउंड रिपोर्टर /माधव काईतवाड बोरगडीकर
हिमायतनगर : हदगाव विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत बाजी कोणी मारणार, जसजशी गुलाबी थंडी वाढत आहे तशतशी गावागावांत चर्चा रंगली आहे. मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्लक असल्यामुळे जिकडे तिकडे निवडणुकीच्या चर्चा सुरू असून, तर्क वितर्क काढले जात आहेत.
पक्षाचे कार्यकर्ते मतदारराजापर्यंत आपला प्रचार पोहोचवीत आहेत. प्रत्येक गावात किती मतदान होईल. कोणाचे पारडे किती जड आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? कोणाची रॅली मोठी होती? कोणाच्या सभेला माणसे किती होती, याची चर्चा सुरू आहे. आमदार आमच्या पक्षाचा होणार, अशा गप्पाचां फड रंगलेला अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
यंदा १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यामध्ये युवक मतदारांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत असल्यामुळे ग्रामीण भागात आपलाच उमेदवार विजयी होणार, अशी चर्चा होत आहे. पानटपऱ्या, चावडी, हॉटेल व कट्ट्यावर विविध पक्षांचे समर्थक विजयाचे गणित मांडत असून, दावे प्रति दावे केले जात आहे. मतदानासाठी दोन दिवसांचा अवधी शिल्लक असल्यामुळे प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ते गावागावांत भेटी गाठी देत आहेत. कौल कोणाच्या बाजूने राहणार यासाठी मात्र मतदान झाल्यावर समजेल. मात्र, असे असले तरी महाविकास आघाडीचे व महायुतीचे कार्यकर्ते मात्र आमचा उमेदवार विजय होणार असल्याचे सांगत आहेत.