माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर – दि.२३ नोव्हेंबर: राज्यात विधानसभा निवडणुकीत मोठा गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा करिश्मा अखेर संपूर्ण राज्यात महायुतीचे पुन्हा सत्तास्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करुन गेला असून,किनवट/ माहूर विधानसभा निवडणुकीच्या आज शनिवार २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार तथा महायुतीकडून भाजपाचे अधिकृत उमेदवार भिमराव रामजी केराम विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रदीप नाईक यांच्यात दुहेरी अटीतटीची लढत होऊन महायुतीचे उमेदवार आमदार भीमराव केराम यांचा सलग दोनपंचवार्षीक निवडणुकीत दुसऱ्यांदा दणदणीत विजय झाला असून,त्यांनी या विजयामुळे भाजपाकडून १९९५ व १९९९ या सलग दोन विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या डी.बी.पाटील यांच्या विक्रमाची बरोबरी साधली.टपाली मतदान समाविष्ट होण्याचे बाकी असताना शेवटच्या चोविसाव्या मतमोजणीचे फेरीअखेर केराम यांना 92 हजार 856 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रदीप नाईक यांना 87 हजार 220 मते मिळाल्याने
केराम हे 5 हजार 636 मतांनी विजयी झालेत.या विजयाचे जोरदार स्वागत करत भाजपाचे नगरसेवक गोपू महामुने, भाजपाचे नेते अनिल वाघमारे तालुका अध्यक्ष कांतराव घोडेकर यांच्यासह माहूर तालुका भाजप व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला.
मतमोजणीच्या शेवटच्या काही फेरीअखेरपर्यंत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर भीमराव केराम यांना त्यांच्या लाडक्या बहिणींनी तारले असून, लाडक्या बहिणींसोबतच मानाचे दाजीही केराम यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीनिशी खंबीरपणे उभे राहिल्यानेच ही विजयी आघाडी मिळाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रदीप नाईक यांच्या भायांची एकजुटीची ताकद लाडक्या बहिणी व मानाच्या दाजींच्या वज्रमुठीपुढे कमी पडली असल्याचे या निवडणुक निकालावरून दिसून येते.
“एक है तो सेफ है” हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐक्याचा नारा देशवासियांमध्ये एकजुटीचा जागर निर्माण करणारा संदेश घेऊन आला आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा भरुन गेला.त्यावर लाडक्या बहिणींचा छप्परफाडके मिळालेला आशिर्वाद यामुळेच राज्यात आमच्या महायुतीला अभूतपूर्व असे भक्कम यश मिळाले आहे.किनवट माहूर मतदारसंघात मी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची पोचपावती मतदाररांनी भरघोस मते देऊन माझ्या झोळीत टाकली असल्यानेच माझा विजय सुकर झाला आहे.मी तमाम मतदारांचा सदैव ॠणी असून, माझ्या मतदारसंघातील माझे महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, हितचिंतक, समर्थक यांच्यासह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्या विजयात हातभार लावत जिवापाड मेहनत घेणाऱ्या सर्वांना माझा जय श्रीराम, खूप खूप धन्यवाद!”असे ॠण उतराईचे भावोद्गार महायुतीच्या भाजपाचे विजयी आमदार भीमराव केराम यांनी आज झालेल्या विजयानंतर दै.तरुण भारतशी बोलताना व्यक्त केले.
*विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024,83- किनवट विधानसभा मतदार संघ अंतिम निकाल : EVM वर नोंदविलेली सर्व मते + टपाली मते एकत्रित करुन उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत..
*गंगाधर माल्लाजी सर्पे- बहुजन समाज पार्टी :673
*जाधव प्रदीप नाईक- नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार :87220*
*भीमराव रामजी केराम- भारतीय जनता पार्टी, :92856*
*अशोक संभाजीराव ढोले- रिपब्लिकन पक्ष खो. रि.पा. :5311
*डॉ. आमले पुंडलीक गोमाजी- वंचित बहुजन आघाडी :4515
*स. इमरान अली- इंडीयन नॅशनल लीग :200
*गोविंद सांबन्ना जेठेवार- राष्ट्रीय समाज पक्ष :136
*जयवंता केसर पवार-अपक्ष :175
*जाधव सचिन माधवराव (नाईक) अपक्ष :5511
*जितेंद्र अनिलराव कुलसंगे-अपक्ष :259
*दिलीप धरमसिंग जाधव नाईक-अपक्ष :543
*धावारे राजेश नारायण-अपक्ष : 230
*ॲड. प्रदिप देवा राठोड-अपक्ष :582
*विजय काशीनाथ खुपसे-अपक्ष :1686
*शेख फय्याजोद्दीन फक्रोद्दीन-अपक्ष :624
*संदिप निखाते-अपक्ष :375
संदीप पाटील कऱ्हाळे-अपक्ष :198
नोटा :1266
एकूण वैध मते 202360
अशी माहिती मीडिया कक्ष
83-किनवट विधानसभाकडून देण्यात आली आहे.