माहूर तालुका प्रतिनिधी /विजयसिंह हजारी
माहूर : एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान व्हावेत यासाठी माहूर व किनवट तालुका शिवसेनेच्या वतीने आज बुधवारी सकाळी माहूर गडावरील श्री रेणुकादेवी मंदिरात महाआरती करण्यात आली. शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळू दे!असे देवीला भावनिक साकडे घालण्यात आले.
राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला असताना महायुतीकडील नवनिर्वाचित आमदारांमधून याआधी मंत्रीपद भोगलेल्यांसोबतच यापूर्वी कधीही मंत्रीपदावर वर्णी न लागलेल्या अनेक मातब्बरांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत.आपल्या नेत्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या समर्थकांनी आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, मंत्रीपद मिळावे यासाठी चक्क देव पाण्यात बुडवून ठेवलेले असून, एकनाथ शिंदे हेच पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत, यासाठी आज बुधवार दि.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० वा.माहूर व किनवट तालुका शिवसेनेच्या वतीने माहूर तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांच्या नेतृत्वाखाली माहूरगडावरील श्री रेणुकादेवी मंदिरात महाआरती व प्रार्थना करत मातेला साकडे घालण्यात आले.
यावेळी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे माहूर तालुका प्रमुख सुदर्शन नाईक म्हणाले कि,
विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा होते. त्यांच्याच कॅप्टनशीप खाली महायुतीने निवडणूक लढवली आणि मोठ्या बहुमताने जिंकली. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे हे साधं तीन तास देखील झोपले नाहीत हे सर्वश्रुत आहे.महाराष्ट्र सुखी-समृद्ध व्हावा, यासाठी ते दिवसरात्र काम करत होते.
राज्यातील महिलांना स्वावलंबी करता यावे, यासाठी महायुतीकडून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणण्यात आली.जी सुपरहिट ठरली.याच लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात भरभरुन यश टाकले. याचे पूर्ण श्रेय महायुतीचे कॅप्टन म्हणून शिंदे यांना जाते. त्यामुळे ज्या भावाने आम्हाला स्वावलंबी बनवले तोच भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसावा, अशी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींची इच्छा आहे! यासाठी आज आम्ही श्री रेणुकादेवीच्या चरणी साकडे घातल्याचे शिवसेना माहूर तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी शहर प्रमुख विकास कपाटे, संघटक विनोद सूर्यवंशी,सुनिल गरड,महीला आघाडी तालुकाध्यक्ष ज्योती टिपकर, युवासेना शहराध्यक्ष विजयराणा हजारी,पवन शर्मा,मनोज तिरमवार,किरण मीरमे, संघपाल,
कवठेकर, संजय जोशी,कैलास जाधव,अरविंद जयस्वाल, विशाल चौधरी,आदेश लांडगे आदींंची उपस्थिती होती.