बीड – जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात अनेक आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे चित्र आहे. अशातच या प्रकरणात आरोप असलेले केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
त्यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आलाय.तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्यासह सात जणांचा सहभाग आढळला, यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अद्याप चार आरोपी फरार आहे. दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आल्याने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आलंय. त्या पाठोपाठ आता पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. मात्र प्रशांत महाजन यांना दोषी पकडून या प्रकरणांमध्ये त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी दलित पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे.