तासगाव – विधानसभा निवडणुकीनंतर आमदार रोहित पाटील यांनी कामांचा धडाका लावला आहे. प्रत्येक विभागामध्ये जाऊन आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी आमदार रोहित पाटील यांनी तासगाव नगरपालिकेमध्ये जाऊन प्रत्येक विभागाची माहिती घेतली.
पाणीपुरवठा विभागाकडून योग्य व्यवस्थापन होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. यावर पाटील यांनी शहरात स्वच्छ आणि योग्य पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी नागरिकांकडून भरून घेण्यात आलेल्या पैशांचे पुढे काय झाले, असा सवालही त्यांनी केला. वीजपुरवठा विभागाचा आढावा घेताना अनेक भागात पथदिवे नसल्याचे दाखवून त्यासाठी निधी मंजूर करून आणू, असे आश्वासन दिले.
कस्तुरबा रुग्णालयात डायलिसीस सेंटर सुरू करणार
आमदार रोहित पाटील म्हणाले, तासगाव शहरात एवढे मोठे कस्तुरबा रुग्णालय उभे आहे. मात्र, याठिकाणी अद्याप सर्व सोयी उपलब्ध नाहीत. लवकरच येथे डायलिसीस सेंटर मंजूर करून आणू. वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा करून अधिकचा कर्मचारी वर्गही मंजूर करून आणू.
…आता चूक चालणार नाही
आमदार रोहित पाटील म्हणाले, मागील दहा वर्षांत पालिकेमध्ये काय झाले, यावर मला चर्चा करायची नाही. मात्र, नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक याठिकाणी झालीच पाहिजे. इथून पुढे कोणत्याही कामात मला दिरंगाई, चूक चालणार नाही.