अयोध्येतील पोटनिवडणुकीत मध्ये  योगींची प्रतिष्ठा पुन्हा पणाला.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

सपा नेते अखिलेश कुमारही लोकसभेप्रमाणेच या पोटनिवडणुकीतही अयोध्येतील जनता आपल्यासोबत असल्याचे दाखवून देण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला होता. प्रामुख्याने अयोध्येतील पराभव भाजपसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीनंतरही हा पराभव झाल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता.

अयोध्या जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेच्या बनलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसोबतच या मतदारसंघातही निवडणूक होणार आहे. पाच फेब्रुवारीला मतदान तर आठ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे अयोध्येत पुढील महिनाभर निवडणुकीचे वारे वाहणार आहेत.

समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद हे मिल्कीपूरचे आमदार होते. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. आता त्यांचे पूत्र अजित प्रसाद यांना सपाने या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अद्याप भाजपकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.

मिल्कीपूर पोटनिवडणुकीमुळे पुन्हा भाजप व समाजवादी पक्षामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. ही निवडणूक जिंकून पुन्हा आपला दबदबा सिध्द करण्यासाठी योगी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, हे निश्चित आहे. तर दुसरीकडे सपा नेते अखिलेश कुमारही लोकसभेप्रमाणेच या पोटनिवडणुकीतही अयोध्येतील जनता आपल्यासोबत असल्याचे दाखवून देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीपासूनच दोन्ही पक्षांकडून प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. योगींनी या मतदारसंघाची जबाबदारी सहा मंत्र्यांवर सोपवली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्रीही मागील काही दिवसांत सातत्याने मिल्कीपूरचा दौरा करत आहेत. योगीही मतदारसंघातील प्रत्येक राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

Share This Article
error: Content is protected !!