स्व. मुकेश चंद्राकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आवाहन.
देगलूर/प्रतिनिधी,नागेश पलपवार
देगलूर – छत्तीसगडमधील बिजापूर गावात घडलेल्या पत्रकार स्व. मुकेश चंद्राकर यांच्या निघृण हत्येचा पत्रकार संरक्षण समिती देगलूरने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि स्व. पत्रकार मुकेश यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे.
पत्रकार स्व. मुकेश चंद्राकर यांनी खराब रस्त्याच्या निर्मितीतील भ्रष्टाचार उघड केला होता. या सत्य बातमीमुळे संबंधित कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांनी त्यांची निघृण हत्या केल्याचे उघड झाले. मृतदेह कंत्राटदाराच्या आवारातील सेप्टिक टँकमध्ये आढळून आला असून, तपासादरम्यान मृतदेहावर वार केल्याचे स्पष्ट झाले आहे.पत्रकार संरक्षण समितीने गृहमंत्री अमित शहा यांना निवेदनाद्वारे पुढील मागण्या केल्या आहेत:
१. स्व. मुकेश चंद्राकार यांच्या हत्येप्रकरणी दोषींना जलदगती न्यायालयातून फाशीची शिक्षा देण्यात यावी.
२. देशभरात पत्रकारांच्या संरक्षणासाठी तातडीने पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा.
३. स्व. चंद्राकर यांच्या कुटुंबीयांना भारत सरकारकडून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.
पत्रकार संरक्षण समितीने चेतावणी दिली आहे की, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीव्र जन आंदोलन छेडले जाईल. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे समितीने नमूद केले आहे.
या निवेदनावर शेख असलम (तालुकाध्यक्ष), मिलिंद वाघमारे (सचिव), धनाजी देशमुख (कार्याध्यक्ष), तौहिद काझी (कोषाध्यक्ष), गजानन टेकाळे (संघटक), मनोज बिरादार (सहसचिव), धनाजी जोशी (प्रसिद्धीप्रमुख), गजानन शिंदे (सहकोषाध्यक्ष) तसेच विशाल पवार (राज्य उपाध्यक्ष प्रेस सेवा पत्रकार संघ), सय्यद समी, अनील पवार, जैन्नौदीन पटेल आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत व यासह अनेक पत्रकार व नागरिक उपस्थित होते…