नांदेड प्रतिनिधी /हरजिंदरसिंघ संधू
नांदेड – यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून नरेंद्र मोदी सरकारची सर्वसामान्यांप्रतीची कटीबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या अर्थसंकल्पात ‘GYAN’ म्हणजे गरीब, युवक, अन्नदाता व नारीशक्तीला केंद्रस्थानी दिसून येतो.
या अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य प्राप्तीकर, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाख रुपये करणे, असे शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी अनेक चांगले प्रस्ताव आहेत. सरकारी माध्यमिक शाळा व आरोग्य केंद्रांमध्ये ब्रॉडबॅंड कनेक्टिव्हिटीच्या निर्णयाने शैक्षणिक दर्जा वाढेल आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत चांगले बदल घडून येतील. कॅन्सर आणि इतर जीवनरक्षक औषधे स्वस्त केल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटरच्या स्थापनेचा निर्णयही स्वागतार्ह आहे.
सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी सुद्धा केंद्र सरकारने चांगली पावले उचलली आहेत. एमएसएमईसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर ५ कोटींवरून १० कोटी रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल. नव्या विकास योजनांसाठी १० लाख कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणूक करण्याच्या निर्णयामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल.
या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न दिसून येतो. महिला तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींमध्ये पहिल्यांदाच उद्योजकतेच्या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी विशेष योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या वर्षात देशात १० हजार मेडिकलच्या जागा वाढविल्या जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या व देशाच्या सर्वांगीण प्रगतीला फोकस करणाऱ्या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करते.