नांदेड प्रतिनिधी /हरजिंदर सिंघ संधू
नांदेड – दि.10 इराणमधील सुरक्षा यंत्रणांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेले वसमतचे मूळ रहिवासी व नांदेडचे नागरिक असलेले उद्योजक अभियंते योगेश पांचाळ यांनी सुखरूप मायदेशी परतल्यानंतर आज माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन आभार मानले.
येथील सिडको परिसरातील रहिवासी असलेले योगेश पांचाळ यांचा एअर कुलर्सचा व फळांचा व्यवसाय आहे. या निमित्ताने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते इराणची राजधानी तेहरान येथे गेले होते. मात्र तेथील सुरक्षा यंत्रणांनी त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले. तब्बल दोन महिने ते इराणी यंत्रणांच्या ताब्यात होते. दरम्यानच्या काळात योगेश पांचाळ यांच्या पत्नी व भोकर नगर परिषदेमधील अभियंता श्रद्धा पांचाळ व त्यांच्या नातलगांनी दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेक नेत्यांच्या भेटी घेऊन या प्रकाराची माहिती दिली. खा. अशोकराव चव्हाण यांना या प्रकाराची माहिती त्यांनी पांचाळ कुटुंबाची नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. त्यांनी स्वतः परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली. मुंबईतील इराणच्या दूतावास अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनाही याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली. विदेशामध्ये बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलेल्या भारतीय नागरिकांचा मुद्दा त्यांनी राज्यसभेत उचलून योगेश पांचाळ यांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाने आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी केली.
अखेर गेल्या सोमवारी योगेश पांचाळ यांची मुक्तता करण्यात आली व मंगळवारी पहाटे ते सुखरूप भारतात परतले. खा. अशोकराव चव्हाण चव्हाण यांच्या निवासस्थानी आज झालेल्या भेटीत योगेश पांचाळ यांनी इराणमध्ये त्यांच्या समवेत घडलेल्या घटनाक्रमाची माहिती दिली.