नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – दि.२३.आमच्या मुलीसोबत का बोलतोस,’असं म्हणत प्रेयसीच्या नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तसंच तुझी गावामध्ये बदनामी करू,अशी धमकी देखील दिली. याच भीतीपोटी नांदेडमधील एका १९ वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सुगांव येथे ही घटना घडली.या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात मुलीसह ७ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतय.
जिल्ह्यातील सुगाव येथील एका १९ वर्षीय तरुणाचं गावातील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. तीन ते चार वर्षांपूर्वी दहावीत शिकत असताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.एका वर्षापूर्वी मुलीच्या घरच्यांना त्यांच्या या प्रेम प्रकरणाबाबत माहिती मिळाली. यावेळी दोघांची घरच्यांनी समजूत काढली. मात्र, तरीही दोघांचं प्रेम प्रकरण सुरूच होतं. सहा महिन्यांपूर्वी मुलीच्या चुलत भावानं तरुणाला मुलीसोबत फोनवर बोलण्याच्या कारणावरून मारहाण केली होती. त्यानंतर १८ मार्च रोजी तो कामावरून घरी परतत असताना मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला पुन्हा मारहाण केली. तसंच,गावात तुझी बदनामी करू,अशी धमकीही दिली. यामुळं तरुण खूप घाबरला होता.
उचललं टोकाचं पाऊल : या घटनेनंतर भीतीपोटी तरुणानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.त्यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन मुलीसह सात जणांविरोधात लिंबगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.