नांदेड-मुंबई विमानसेवेसाठी केंद्रीय मंत्री नायडू व खा. अशोकराव चव्हाण यांची चर्चा…

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड प्रतिनिधी/ हरजिंदर सिंघ संधू 

नांदेड – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू यांची भेट घेऊन नांदेडच्या श्री गुरुगोबिंद सिंघजी विमानतळावरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळासाठी थेट हवाईसेवा सुरु करण्याच्या मागणीच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली. 

     संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान खा. अशोकराव चव्हाण यांनी नागरी उड्डयन मंत्री के राममोहन नायडू यांची भेट घेऊन या मागणीबाबत चर्चा केली. नांदेड-मुंबई थेट विमानसेवा सुरु करण्यामागे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसणे हे प्रमुख कारण आहे. मात्र, नवी मुंबई विमानतळ लवकरच कार्यान्वीत होत असून, त्यानंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचे खा. चव्हाण यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. नवी मुंबईचे विमानतळ सुरु झाल्यानंतर मुंबई विमानतळावर नांदेड-मुंबई थेट विमानसेवेसाठी स्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणीचाही त्यांनी पुनरूच्चार केला. 

   या चर्चेची तातडीने दखल घेत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सद्यस्थिती जाणून घेतली व नांदेड-मुंबई थेट विमानसेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ते निर्देश दिले. या विमानसेवेसाठी मुंबईला स्लॉट मिळावा, यासाठी खा. अशोकराव चव्हाण केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर सतत पाठपुरावा करीत असून, केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

नांदेड विमानतळावर मनुष्यबळ वाढणार

दरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नांदेड विमानतळावरील मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिलपासून २ हवाई वाहतूक व्यवस्थापन अधिकारी व १ संचार, दिशादर्शन तथा देखरेख यंत्रणा अधिकारी नांदेड विमानतळावर नियुक्त होणार आहेत. या तीन अधिकार्‍यांच्या नियुक्तांमुळे विमानसेवांचा विस्तार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Share This Article
error: Content is protected !!