नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड : तलाठी भरती आणि सीईटी परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नागपूर केंद्र मिळाले. पण वेळेत पोचता यावे यासाठी नांदेड आगारातून अतिरिक्त बस नव्हत्या, शिवाय नियमित बसेस देखील दोन तास उलटून गेल्या तरी आल्या नव्हत्या.
यामुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांनी माजीमंत्री अशोक चव्हाण यांना संपर्क साधला आणि त्यांनी देखील तात्काळ मदत केली.
या संदर्भात अशोक चव्हाण यांनी स्वतः माहिती देतांना सांगतिले की, आज तलाठी भरती व सीटीईटीची परीक्षा होती. नांदेड जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना नागपूर हे केंद्र मिळाले होते. नागपूरला जाण्यासाठी काल रात्री मोठ्या संख्येने विद्यार्थी नांदेड बसस्थानकावर एकत्रित झाले होते. मात्र, नांदेड मार्गे जाणारी सोलापूर-नागपूर ही रात्री ९ वाजता येणारी बस ११ वाजेपर्यंतही आली नाही.
नागपूरला सकाळीच पोहोचणे आवश्यक असल्याने विष्णू कदम नामक विद्यार्थ्याने एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शशिकांत क्षीरसागर पाटील यांना फोन करून अडचण सांगितली. दुसऱ्याच क्षणी त्यांनी मला ही माहिती कळवली. त्यानंतर मी आगारप्रमुख कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला.
परिस्थितीचे गांभिर्य व तातडीने बस सोडण्याची आवश्यकता पाहता त्यांनीही तत्परतेने पावले उचलून रात्री ११.४० वाजता दोन विशेष बस नागपूरसाठी सोडल्या. परिवहन मंडळाचे अधिकारी आणि एनएसयुआय पदाधिकाऱ्यांनी विनाविलंब सहकार्य केल्यामुळे आम्ही वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहू शकलो, अशी भावना नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. अशोक चव्हाण नांदेडच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तात्काळ धावून आल्यामुळे अनेकांना परीक्षेला हजर राहता आले.