नांदेड शहर प्रति/ हरजिंदर सिंघ संधू
नांदेड – एखादी संस्था चालवित असतांना त्यामध्ये त्या संस्थेतील सभासदांचे हित जोपासतांनाच संस्थेला प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी संचालक मंडळाची असते. संगम अर्बन मल्टीस्टेट कॉ.ऑप.क्रेडिट सोसायटीने केवळ एका वर्षात चांगली उभारी घेतली आहे. भविष्यातसुध्दा ग्राहकांचे हित व बँकेची प्रगती याचा संगम साधावा असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केले.
संगम अर्बन मल्टीस्टेट कॉ.ऑप.क्रेडिट सोसायटीचा प्रथम वर्धापन दिन व अर्धापूर येथील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, भाजपाचे प्रदेश प्रतिनिधी धर्मराज देशमुख, नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रविण देशमुख, माजी सभापती श्यामराव पाटील टेकाळे, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, नगरसेवक बाबुराव लंगडे, विशाल लंगडे, प्रल्हाद माटे, बँकेचे अध्यक्ष गजानन वडजे, उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील चाडोंळकर, भाजप प्रवक्ते तथा ज्येष्ठ संचालक संतोष पांडागळे, गुरुराज पाटील चांडोळकर, बालाजीराव कल्याणकर, डॉ.कैलास भाडेकर, बालाजी जाधव, प्रियांका वडजे, ज्योती डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना खा.अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले की, अर्धापूर येथे शेतकरी व व्यापाऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत चांगले आहे. त्यामुळे एकाच परिसरात चार मल्टीस्टेट कॉ.ऑप.क्रेडिट सोसायटीच्या शाखा चालतात. भविष्यातसुध्दा संगम अर्बनने आपला व्यवहार चोख सांभाळत जिल्हाभर शाखांचा विस्तार केला पाहिजे. अर्धापूर येथील त्यांची ही दुसरी शाखा असून या शाखेच्या माध्यमातून ग्राहकांचे हित जोपासतांनाच संस्थेची प्रगती याकडे संचालकांनी लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांचे स्वागत व्यंकटराव पाटील चांडोळकर व संतोष पांडागळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष गजानन वडजे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संतोष पांडागळे यांनी मानले. या वर्धापन दिन व शाखा उद्घाटन सोहळ्यास अर्धापूर शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.