संपादक/आभिषेक बकेवाड
नांदेड – दि. 20- श्रीक्षेत्र माहूरगड येथे स्थित असलेल्या श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधिपती राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर तथा बितनाळकर यांच्या कार्याचा बहूमान करत दि.11 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे ’स्वच्छता दूत’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
तसे नेमणुकीचे पत्र देताना स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कार्यसम्राट आ. डॉ. राहुल पाटील, प्रल्हाद देवडे, सुरेश नाना जगाडे यांच्या उपस्थितीत त्यांना देण्यात आले. त्यावेळी साईनाथ महाराज वसमतकर यांना पुढील वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
साईनाथ महाराज यांनी आजवर आपल्या आश्रमाच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. त्यात दररोजचे अन्नछत्र असो, कोरोना काळात धान्य वाटप असो, रक्तदान असो किंवा रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात मोफत जेवण पुरवणे असो असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत. तसेच साहित्य संमेलनाचे आयोजन, शिष्यवृत्ती शिबिरे, शालेय शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वितरण, व्यवसाय मार्गदर्शन व शिक्षण परिषदसारखे अनेक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
आध्यात्माला विज्ञानाची जोड देेत भक्तीमार्गातून समाज जागृती हा वसा त्यांनी घेतला आहे. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि अन्नदान अशा सप्तसुत्रीचे साईनाथ महाराज पाईक आहेत. त्यांनी आजवर जिथे जिथे आपल्या कीर्तनाचे किंवा दत्त नाम सप्ताहचे प्रमुख म्हणून प्रतिनिधित्व केले तिथे आपण व आपल्या अनुयायांच्या करवी अगोदर स्वच्छता अभियान राबविले, प्रत्येक कीर्तनाच्या सुरूवातीला राष्ट्रगीत आणि नंतरच पुढील कार्यक्रम संपन्न केले आहेत.
रायगड, मोझरी, गाणगापूर तसेच संपूर्ण भारतभर आपल्या अनुयायांना सोबत घेऊन त्यांनी भ्रमण केले आहे, कीर्तन व प्रवचन तसेच सप्तसुत्रीचा प्रसार केला आहे. एवढेच नाही तर भारत पाकिस्तान सिमेवर आटारी-वाघा बॉर्डरवर महाराजांनी दत्त नाम सप्ताहाचे आयोजन करत सैनिकांना दत्त नाम आणि माणुसकीची शिकवण आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून दिली. तिथेही त्यांनी स्वच्छता अभियान राबविले होते.
या सर्व कार्याचा सन्मान करत द.भ.प.सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर यांची महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत म्हणून नेमणूक होणे प्रेरणादायी आहे. महाराजांच्या या नेमणुकीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव आहे. त्याच अनुषंगाने गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भूमन्ना आक्केमवाड भोसीकर यांनी समाजाच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.