माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
माहूर – दि. २२ एप्रिल : लोकशाही विरोधी जन सुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी आज दि.२२ एप्रिल रोजी राज्यातील सर्व डावे पक्ष व समविचारी संघटनांच्या वतीने राज्यभर आंदोलने आयोजित करण्यात आली.त्याच अनुषंगाने माहूर तहसील कार्यालयावर देखील भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
नांदेड जिल्हा जिल्हा सचिव कॉम्रेड शंकर सिडाम यांच्या नेतृत्वाखाली जनसुरक्षा विधेयका विरोधात व इतर मागण्यांबाबत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.यावेळी या संदर्भातील लेखी निवेदन आज पुन्हा एकदा तहसीलदार किशोर यादव यांना देण्यात आले. विशेष म्हणजे याबाबतची पूर्वकल्पना म्हणून माहिती देण्यासाठी सदरील निवेदन दि. २१ रोजीच तहसील कार्यालय व सर्व संबंधित प्रशासनास देण्यात आले होते.
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्यावतीने आज मंगळवार दिनांक २२ रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर व बहुतांश तहसील कार्यालयांवर मोर्चे, धरणे व निदर्शने करून सरकार व समाजाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधून घेण्यासाठी ही आंदोलने करण्यात आले.
विधेयकानुसार महाराष्ट्र सरकारने जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व अन्यायाविरुद्ध संघटीत होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विरोधात जन सुरक्षा विधेयक तयार केले आहे. जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठीच हे विधेयक आणले जात आहे.असाघणाघाती आरोप निवेदनातून करण्यात आला असून जनतेचे संवैधानिक अधिकार काढून घेऊ पाहणाऱ्या राज्य सरकारच्या या कृत्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जाहीर निषेध यावेळी करण्यात आला
हे जन सुरक्षा विधेयक राज्य सरकारने विनाविलंब मागे घ्यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांबाबत आज भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी नांदेड जिल्हा कमिटीचे जिल्हा सचिव कॉ. शंकर सिडाम यांच्या नेतृत्वाखाली माहूर तहसील कार्यालयासमोर शासनाच्या निर्णयाचा विरोध करत मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली.
यावेळी या आंदोलनात माहूर तालुका सचिव कॉ.किशोर पवार, कॉ. डॉ.बाबा डाखोरे, राजकुमार पडलवार, कादर खान,राजु पिरसवाड,कालीदास सोनुले, रमेश मेश्राम, संतोष शेंडे सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.