माहूर तालुका प्रतिनिधी/ बजरंगसिंह हजारी
माहूर : तिर्थक्षेत्र माहूरगड येथील प्रभू श्री दत्तात्रेय, आई श्री रेणुकादेवी, आई श्री अनुसया देवी यांसह सर्व देवदेवतांना वंदन करून श्रीदत्त शिखर संस्थानचे महंत महाराज प.पू. श्री मधुसूदनजी भारती गुरू अच्युत भारती यांच्या कृपाशीर्वादाने श्री दत्त शिखर संस्थान व श्री रेणुकादेवी संस्थान येथे सोमवार दि.२८ एप्रिल रोजी सर्वप्रथम स्वच्छता अभियानाने राज्यभरातील विविध धार्मिक मंदिरं, मठं आश्रमात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाचे स्वच्छतादूत (ब्रॅण्ड ॲम्बेसेडर) म्हणून नुकतेच नियुक्त करण्यात आलेले माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधिपती प. पू. साईनाथ महाराज वसमतकर यांनी दै.आधुनिक केसरीशी संवाद साधताना दिली.
नुकताच आनंदधाम आश्रमात दि. २२ एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत म्हणून निवड करण्यात आलेले साईनाथ महाराज यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. आमचे प्रतिनिधींनी सदरील नियुक्तीबाबत साईनाथ महाराज यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता महाराजांनी आपल्या इच्छुक सर्व भक्तगणांसह संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही मानधनाशिवाय स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्धार बोलताना व्यक्त केला. तसेच आपली स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार भीमराव केराम पालकमंत्री अतुल सावे, खा.अशोकराव चव्हाण यांचे साईनाथ महाराज यांनी आभार मानले आहेत.
महाराजांचे माहूरगड येथील वसमतकर मठात आज २६ रोजी सायंकाळी आगमण होणार असून, पुढील तीन दिवस चंद्र दर्शनापर्यंत ते भाविकांच्या सहवासात राहणार असल्याची माहिती यावेळी दै. आधुनिक केसरीला मठाचे सरव्यवस्थापक, प्रवक्ते भाऊ पाटील हडसणीकर यांनी दिली.