प्रतिनिधी/संजीवकुमार गायकवाड
बार्शी :दि.३०. शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर बार्शी शहर पोलिसांनी पुन्हा कारवाई करत गांजाची विक्री करताना दोघांना पकडले असून ही कारवाई 29 एप्रिल 2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुभाषनगर परिसरातील मिरगणे विटभट्टी परिसरात करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधीक्षक जालिंदर नालकुल,बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे आणि पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक फौजदार अजित शिवाजी वरपे आणि त्यांच्या पथकाने अचानक धाड टाकत दोघांना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सचिन कुमार मिरगणे (वय 33, रा. 14 नंबर शाळेमागे, सुभाषनगर,बार्शी) आणि पांडुरंग सोमनाथ सोनवणे (वय 40, रा.मांडेगाव,ता.बार्शी) अशी आहेत. हे दोघेही मजुरीचे काम करतात. छाप्यामध्ये आरोपींच्या ताब्यातून एकूण 462 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये सचिन मिरगणे याच्याकडून प्लास्टीक पिशव्यांमध्ये भरलेला 320 ग्रॅम गांजा आणि पांडुरंग सोनवणे याच्याकडून पिशव्यांमध्ये भरलेला 42 ग्रॅम गांजा असा एकूण 9,050 रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. हे दोघेही हा गांजा विक्रीसाठी घेऊन बसले होते, असे पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(2)(ब), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.