अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर महंतांनी केली स्थापना
माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
माह्रीूर – दत्तात्रेय शिखर संस्थान श्रीक्षेत्र माहूरगड येथे हिंदू पंचांगातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेल्या आजच्या अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर परमपूज्य गुरुमाऊली श्री श्री 1008 महंत मधुसूदनजी भारती महाराज गुरु अच्च्युत भारती यांच्या पावन हस्ते आज श्री दत्तात्रेय मंदिरातील गर्भगृहातील आधीच्या पुरातन एकमुखी दत्तात्रेय मूर्तीच्या जागी ब्रम्हा-विष्णू- महेश अशा नविन तीन मुखी मूर्तीची स्थापना करण्यात आली.
आज सर्वप्रथम सकाळी 09:15 वाजता चर्या सुमारास श्री दत्तात्रय शिखर संस्थान गर्भ गृहामध्ये महंत महाराज यांच्या हस्ते नविन ब्रह्म विष्णू महेश मूर्तीचा अभिषेकाला सुरुवात झाली. माहूरगडला धार्मिक पौराणिक वारसा लाभलेला असून, विविध देवदेवतांची जागृत देवस्थाने ही कोट्यवधी भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. यामध्ये पौराणिक काळापासून याठिकाणी भगवान श्री दत्तात्रेय यांचे तपश्चर्यास्थान असलेले श्री दत्तात्रेय शिखर मंदिर संस्थान हे देखील होय.
जिथे तेथील गर्भगृहात पुरातन काळापासून चांदीच्या धातु पासून बनवलेली आजपर्यंत एकमुखी दत्तात्रेय मूर्ती होती या प्रभुंच्या मूर्ती चे दर्शन घेण्यासाठी दैनंदिन हजारोंच्या संख्येने भाविक या दत्त गडावर हजेरी लावतात.आता या आधीच्या एकमुखी दत्तात्रेय मूर्तीच्या जागेवर तब्बल 20 किलो चांदी पासून मूर्तिकार तेजस भोयर यांनी तयार केलेल्या सुंदर आणि रेखीव अशा ब्रह्म विष्णू महेश या तीन मुखी दत्तात्रेय मूर्ती ची स्थापना ब्रह्म विष्णू महेश लिंगावर आज अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर पपू.महंत महाराज यांच्या पावन हस्ते विधीवत करण्यात आली.
यावेळी मुख्य पुजारी वासुदेव भारती, दिलीप भारती, चिंतामण भारती, वामन भारती, शिवाजी गिरी महाराज, नितेश भारती, अक्षय गिरी, शिलानंद भारती, श्याम भारती महाराज, पुरुषोत्तम भारती ही सर्व महापुरुष मंडळी उपस्थित होते. संपूर्ण पूजाविधीचे पौरोहित्य विलासराव जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले. सचिन तुकाराम पाटील सचिव उपस्थित होते व्यवस्थापक नाईक साहेब मूर्तिकार भोयर यासह संस्थानचे सर्व नियमित कर्मचारी, उत्सव कर्मचारी व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी संस्थानच्या वतीने दिवसभर भाविकांच्या सेवेसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात ज्या दत्त शिखर संस्थानचे असंख्य प्रमाणात भाविक आहेत. साधु, संन्यासी, अनुयायी आहेत अशा देवस्थानच्या मूर्ती बदला सारख्या एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी कोणत्याही महापुरुषांना आज निमंत्रित करण्यात आले नव्हते, इतकेच नाही तर विश्वस्त मंडळाचे मुख्य पदाधिकारी सुद्धा गैरहजर दिसल्याने भाविकांमध्ये आश्चर्ययासह चर्चेला उधाण आले होते.
पुरातन काळापासून असलेल्या एकमुखी दत्तात्रेय मूर्तीच्या जागेवर नविन तीन मुखी मूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय हा सर्वस्वी श्री दत्त शिखर संस्थान विश्वस्त मंडळाचा असून,अध्यक्ष महंत मधुसूदनजी भारती महाराज यांच्या आदेशानुसार नविन तीन मुखी मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. — गणेश तुकाराम पाटील (ठेंगे ),सचिव,श्री दत्त शिखर संस्थान,माहूरगड.