जांभूळ बेटचा होणार कायापालट; जांभुळबेट संवर्धन समितीच्या मागणीला खासदार संजय जाधव यांच्या विकास निधीतून दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतुद व प्रत्यक्षात कामाला सुरुवात*

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

जिल्हा विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

परभणी- जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण असणारे आणि पर्यटकांना नेहमीच साद घालणारे जांभुळबेट हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. परभणी जिल्ह्यातील पालम आणि पूर्णा तालुक्यांना स्पर्श करून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या मध्यभागी असणारे हे बेट म्हणजे जैवविविधतेचा उत्तम असा नमुना होय. मध्यंतरीच्या काळात जांभूळ बेटाला पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे सर्व बाजूंनी नुकसान पोहोचले होते शिवाय बेटावर जांभळीची झाडे कमी होऊन वेड्या बाभळींचे जंगल माजले होते.पर्यटकांना तिथे पोहोचण्यासाठी कसलीही व्यवस्था नव्हती मात्र जांभुळबेट संवर्धन समितीने कृषिभूषण कांतराव काका झरीकर यांच्या पुढाकारातून जांभूळ बेटावर अनेक सुविधा निर्माण केल्या. दिग्रस बंधाऱ्यामुळे भरपूर पाण्याची साठवण होत असल्यामुळे बेटापर्यंत पोहोचण्याचा कसलाही मार्ग नव्हता तेव्हा जांभूळ बेट संवर्धन समितीने बोटीची व्यवस्था केली. बेटावरील मंदिरासमोर शेड, स्वच्छतागृह, झाडांची लागवड, ठिबक सिंचनाची व्यवस्था आदि सुविधा निर्माण केल्यामुळे पर्यटकांचा ओढा मागील चार वर्षापासून वाढला आहे.

मागील चार वर्षांपासून नियमितपणे झेंडावंदनही बेटावर होत आहे. या बेटावर आणखी पर्यटकांसाठी सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी परभणीचे खासदार मा. संजय जाधव यांच्याकडे संवर्धन समिती व परिसरातील नागरिकांनी आवाहन केल्यामुळे मा. खासदार संजय जाधव यांनी आपल्या स्थानिक विकास निधीमधून सोमेश्वर ते जांभुळबेट हा मुख्य रस्ता तसेच जांभूळ बेटावर,पेव्हर ब्लॉक, स्वच्छतागृह, वृक्षारोपण, शेड आदि सुविधांसाठी दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.

या विकास निधीतून मूलभूत सुविधा पर्यटकांसाठी निर्माण होतील आणि पर्यायाने पर्यटकांची पाऊले जांभूळ बेटाकडे निश्चित वळतील अशी आशा निर्माण झाली आहे. हा विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जांभुळबेट संवर्धन समिती आणि परिसरातील नागरिकांनी मा.खासदार संजय जाधव यांचे आभार व्यक्त केले आहेत.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!