वो सिकन्दर ही दोस्तों कहलाता है, हारी बाज़ी को जीतना जिसे आता है!
वो हैं डॉ. निशांत चव्हाण!
माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
माहूर– बी.ए. चं द्वितीय वर्ष केवळ १८ वर्षांचं वय आणि प्रचंड वज्राघात ‘स्टेज IV कोलन कॅन्सरचे धक्कादायक निदान!’ टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई डॉक्टरांनी केवळ तीन महिन्यांच्या आयुष्याची लाईफ लाईन ओढलेली असताना देखील त्यावेळी “माझ्या नावापुढे एक दिवस ‘डॉ.’ लागेल!” हे आत्मविश्वासाने भरलेले दृढनिश्चयी वाक्य होतं निशांत श्याम चव्हाण यांचं. त्यांच्या मनातील जिद्द आणि स्वप्नं आज प्रत्यक्षात उतरली असून, त्यांनी केवळ कॅन्सरवर मात केली नाही तर तर अर्थशास्त्र विषयात पीएचडी मिळवून आपल्या नावापुढे डॉक्टर हे पदनाम देखील झळकावले आहे.सलाम त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाला!
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येतील आदिवासी भागातून आलेल्या डॉ. चव्हाण यांनी केवळ कॅन्सरवर मात केली नाही, तर अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. मिळवून सध्या पुण्यातील नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
२०१६ मध्ये फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असताना त्यांना कोलन कॅन्सरचे निदान झाले. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथील डॉक्टरांनी त्यांना केवळ तीन महिन्यांचे आयुष्य दिले होते. मात्र, निशांत यांनी हार मानली नाही. तब्बल ८ कीमोथेरपी आणि ५ मोठ्या शस्त्रक्रिया यांचा सामना करत त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले.
या कठीण प्रवासात त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. आणि एम.ए. अर्थशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर SET आणि NET या महत्त्वाच्या पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या,तेही उपचार सुरू असतानाच.
अलीकडेच त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून “पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांतील पीक पद्धतीतील बदलांचे तुलनात्मक अध्ययन (२०१०-२०२०)” या विषयावर पीएचडी. मिळवली. हे संशोधन प्रा. डॉ. पी. आर. मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
आपल्या यशाबद्दल बोलताना डॉ. चव्हाण म्हणतात, “या प्रवासात मी एकटा नव्हतो. माझ्या पाठीशी उभे राहिलेले डॉक्टर, शिक्षक आणि कुटुंब आणि सर्व स्नेहांकित हे माझे खरे आधारस्तंभ आहेत!”शेवटी डॉ. चव्हाण यांच्या या धैर्यगाथेबद्द्ल म्हणावेच लागेल कि,“वो सिकन्दर ही दोस्तों कहलाता है, हारी बाज़ी को जीतना जिसे आता है!