कालपासून कृषी सहाय्यक संघटनेचे आंदोलन; अन्यथा १५ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन

abhishek bakkewad
5 Min Read
Spread the love

माहूर ता.प्रतिनीधी/

माहूर : कृषी विभागाच्या होऊ घातलेल्या आकृतिबंधामध्ये कृषी सहायकांच्या पदोन्नतीची कुंठितावस्था दूर करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माहूर तालुका कृषी सहायक संघटनेने आज सोमवार ०५ मे पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यादरम्यान त्यांच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास १५ मे पासून सर्व योजनांच्या कामावर बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून शासनास दिला आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी या पूर्वी आंदोलन पुकारले होते. त्या पार्श्वभूमीवर १० फेब्रुवारी २०२५ रोजी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत पंधरा दिवसांत मागण्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, आजपर्यंत मागण्यांची पुर्तता झाली नाही. त्यामुळे कृषी सहाय्यकांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून

कृषी विभागाच्या होऊ घातलेल्या आकृतिबंधामध्ये कृषी सहायकांच्या पदोन्नतीची कुंठितावस्था दूर करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी सहायक संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.यामुळे कृषी सहायकांची पदोन्नतीची कुंठितावस्था दूर होऊन त्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. या मागणीसाठी व कृषी सहायक यांना प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर कामकाज करीत असताना उद्भवणाऱ्या विविध अडचणींची सोडवणूक करण्यात यावी, यासाठी कृषी सहायक संघटना ऐन खरिपाच्या तोंडावर आक्रमक आंदोलनाची भूमिका घेत आहे.

पुणे येथील ९ एप्रिल २०२५ कृषी विभागाच्या कार्यशाळेमध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी, कृषी सहायकांना लॅपटॉप देणार, कृषी सहायक संवर्गाचे पदनाम बदल करणार असल्याचे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात या घोषणा अद्याप पूर्णत्वास आलेल्या नाहीत. क्षेत्रीय पातळीवर काम करताना कृषी सहायकांना विविध अडचणीना तोंड देत काम करावे लागत आहे.

कृषी सहायकांवरील अन्यायाविरोधात वरिष्ठ स्तरावरून कुठलीही दखल घेतली जात नाही, असे कृषी सहायक संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे नाइलाजाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत असल्याचे कृषी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुधीर राजुरकर व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मागण्या…

कृषि सेवक कालावधी रद्द करुन कृषि सेवकांना नियमित कृषि सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी.कृषि सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषि अधिकारी करणे. कृषि विभागामधील संपूर्ण कामकाज Digital स्वरुपात होत असतांनाही कृषि सहाय्यकांना Laptop (लॅपटॉप) दिला जात नाही.

कृषि सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषि मदतनिस देण्यात यावा. (ग्रामस्तरावर समकक्ष असणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकाप्रमाणे मदतनिस मिळावा.)

निविष्ठा वाटपासंदर्भात वारंवार निवेदन देवून सुध्दा त्यामध्ये सुसुत्रता येत नसून, कृषि सहाय्यकांना वाहतुक भाड्यापोटी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. तरी मार्गदर्शक सुचनेमध्ये विविध योजनेत कृषि सहाय्यक यांना वाहतुक भाड्याची तरतूद करावी किंवा निविष्ठा वाटप परमिटद्वारे करावे. अन्यथा खरीप हंगाम २०२५ मधील निविष्ठा वाटपावर संघटनेचा बहिष्कार असेल.

कृषि विभागाचा आकृतीबंधास तात्काळ मंजुरी द्यावी व त्यामध्ये कृषि पर्यवेक्षक यांची पदे वाढवून कृषि सहाय्यकांच्या पदोन्नतीमधील कुंटितावस्था दूर करावी व महसुल विभागाप्रमाणे आकृतीबंध करावा. कृषि सहाय्यक कृषि पर्यवेक्षक यांचे प्रमाण ४:१ या प्रमाणे करावे,

POCRA योजनेमध्ये समूह सहाय्यकांची पदे पूर्वीप्रमाणे भरण्यात यावीत,MREGS योजनेअंतर्गत लक्षांक देतांना क्षेत्रिय स्तरावरील अडचणीचा विचार करुन लक्षांक देण्यात यावे, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करणे व तांतर करावयाच्या कामाबाबत महसुल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या जबाबदाऱ्यांबाबत योग्य न्यायसंगत कार्यपध्दती तयार करण्यात यावी,सिल्लोड तालुक्यातील कृषि सहाय्यक यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रकारानंतर सदर प्रकरणाची विभागामार्फत चौकशी पूर्ण होवून सुध्दा संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, त्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी,कृषि सहाय्यक संवर्गाच्या आस्थापनाविषयक अडचणींची सोडवणूक करण्यात यावी, कृषी सहाय्यकांच्या १० वर्ष सेवेनंतर एस-१३ ऐवजी एस-१४ वेतन श्रेणी लाभ देण्यात यावा (ग्रामविकास अधिकारी यांचे प्रमाणे). 

या प्रलंबित मागण्यांची तातडीने सोडवणूक करावी अन्यथा, नाईलाजास्तव कृषि सहाय्यक संघटनेस खालील टप्प्यांप्रमाणे आंदोलन पुकारेल असा गंभीर इशारा कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने शासनास निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर कृषी सहायक संघटने तालुका अध्यक्ष सुधीर राजुरकर, उपाध्यक्ष गणपत सुर्यवंशी,सचिव गणेश साबळे, महिला प्रतिनिधी श्रीमती अंजली राजुरकर, सदस्य सुनील शेवाळकर व ऋषिकेश कोवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आंदोलनाचे टप्पे 

दि.०५ मे कृषि सहाय्यक काळ्या फिती लावून निषेध नोंदवून कामकाज करतील, ०६ पासून कृषि सहाय्यक सर्व शासकीय What’s App ग्रुपमधून बाहेर पडतील,

०७ रोजी सर्व तालुका कृषि अधिकारी कार्यालयासमोर कृषि सहाय्यक धरणे आंदोलन करतील, ०८ रोजी एक दिवस कृषि सहाय्यक सामुहिक रजेवर जातील. ०९ मे पासून सर्व Online कामकाजावर बहिष्कार टाकतील. यानंतरही कृषि सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्यास…. दि.१५ मे पासून सर्व योजनेच्या कामकाजावर बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल.असा ठणठणीत इशारा माहूर तालुका कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून शासनास देण्यात आला आहे.

Share This Article
error: Content is protected !!