“नांदेडचाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान! ‘दिलीप ठाकूर’ यांना टाळ्यांचा कडकडाट; माहूरकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
माहूर तालुका प्रतिनिधी/ बजरंगसिंह हजारी
माहूर : आजच्या प्रचंड स्पर्धेच्या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात एखादा पुरस्कार मिळणेही अवघड असताना सामाजिक कार्यकर्ते धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी पुरस्कारांची शंभरी पूर्ण करत सेवाभावी क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या या दुर्लभ यशाच्या गौरवार्थ ‘लोकशाही मराठवाडा रत्न’ या मानाच्या पुरस्काराने नुकतेच त्यांना सन्मानित करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथील पंचतारांकित हॉटेल हयात पॅलेस येथे आयोजित भव्य ‘मराठवाडा संवाद 2025’ या समारंभात ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याची माहिती दिलीप ठाकुर यांनी दिली आहे.या गौरवाने ठाकूर यांची सामाजिक कार्यातील शंभराव्या पुरस्काराची शृंखला पूर्ण झाली आहे.
या अतुलनीय उपलब्धीबद्दल माहूर येथील राजपूत समाजातील नागरिकांसह सर्वधर्मिय जनतेकडून शतपुरस्कारी ठाकुर यांच्यावर कौतुकासह अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
या रंगतदार सोहळ्यात केंद्रीय माजी अर्थमंत्री खा. डॉ. भागवत कऱ्हाड, मराठा आरक्षणाचे जननायक मनोज जरांगे पाटील, माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार प्रशांत बंग, आ. संजय केनेकर, माजी खासदार इम्तियाज जलील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात मराठवाड्यात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 15 मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातून एकमेव ॲड. दिलीप ठाकूर यांची निवड होणे ही नांदेडसाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध वृत्तनिवेदक अजिंक्य भातांब्रेकर व राघवी ओम सावंत यांनी केले. त्यांनी मंचावर आमंत्रित करताना सांगितले की, “22 वर्षांत 13 लाखांहून अधिक रुग्णांना ‘भाऊचा डबा’ देणाऱ्या, 57 महिन्यांत 2,500 पेक्षा अधिक बेघर व्यक्तींना दाढी, स्नान, कपडे देऊन जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडविणाऱ्या आणि 90 पेक्षा अधिक समाजोपयोगी उपक्रम अविरतपणे राबवणाऱ्या दिलीप ठाकूर यांना *‘एक्सलन्स इन सोशल वर्क’* या श्रेणीत हा पुरस्कार दिला जात आहे.”
पुरस्कारांचे नॉटआऊट शतक
देशभरातील विविध नामांकित संस्था व संघटनांनी दिलीप ठाकूर यांना आजवर 100 पेक्षा अधिक सन्मान बहाल केले आहेत. त्यामध्ये धर्मभूषण, गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र रत्न, मराठवाडा भूषण, शान ए नांदेड, देवदूत उपाधी, कर्मयोगी पुरस्कार, राजरत्न, संवेदनशील कार्यकर्ता पुरस्कार, इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स अवॉर्ड, शिवरत्न, रेअर अवॉर्ड अशा दिमाखदार पुरस्कारांचा समावेश आहे.
वर्षभरात 90 हून अधिक उपक्रमांद्वारे कार्य करणाऱ्या ठाकूर यांच्या ‘भाऊचा माणुसकीचा फ्रिज’, ‘लायन्सचा डबा’ व ‘क्षुधा शांती’ हे तीन उपक्रम 365 दिवस अखंड सुरू असतात. हिवाळ्यात उबदार ब्लॅंकेट वाटप, पावसात छत्री वाटप, उन्हाळ्यात चपला वाटप करून ‘गोपाल चरणसेवा’ या नावाने वर्षभर सेवा दिली जाते.
अतुल सावे, अशोकराव चव्हाण यांच्यासह राज्यातील दिग्गजांकडून कौतुक
पुरस्कार समारंभानंतर मंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, लोकशाही मराठीचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार, सामाजिक कार्यकर्ते बिरबल यादव, व्यापारी संजय उत्तरवार, रामलाल पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिलीप ठाकूर यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गौरव कोंडलकर आणि लोकशाही मराठी न्यूज चॅनेलच्या तंत्रज्ञांनी विशेष परिश्रम घेतले. पंचतारांकित भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.