तब्बल 400 मिली विषारी औषध प्राशन करून संपवली जिवनयात्रा
माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजार
माहूर : तालुक्यातील वाई बाजार येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून तब्बल चारशे मिली विष प्राशन करून आपली जिवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना आज रोजी उघडकीस आली आहे.नुकतीच 09 मे रोजी माहूर येथील उबाठा सेनेचे शहर प्रमुख निरधारी जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ताजी असतानाच वाई बाजार येथील या आत्महत्येच्या सलग दुसऱ्या घटनेने संपुर्ण तालुक्यात दुःखाचे सावट पसरले असून, नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. शिंदे कुटुंबातील घरचा कर्ता पुरुष निघून गेल्याने पिडीत शेतकरी कुटुंबाला शासनााने तातडीची मदत देण्याची मागणी परिसरातून होत आहे.
माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील अल्पभूधारक शेतकरी राजू उर्फ आतिष वामनराव शिंदे वय 44 वर्ष, धंदा शेती या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे दोघां भावात मिळून फक्त 41 आर अशी सामाईक शेती आहे. त्याच शेतीच्या आधारे ते आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवतात. तथापि आजच्या या प्रचंड महागाईच्या काळात आपल्या अल्पशा शेतीतील तोकड्या उत्पन्नाच्या भरवश्यावर कुटुंबाचा प्रपंच चालवताना नाईलाजास्तव खाजगी सावकारीचे प्रचंड कर्ज झाले असल्याचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान काल शनिवार दि. १० रोजी बाहेरगावच्या एका लग्नसमारंभाला जाऊन येतो असे सांगून बाहेर गेलेल्या राजु शिंदे यांनी दुपारी सव्वाबारानंतर कुणाचाही कॉल घेतला नसल्यामुळे घरची मंडळी चिंताग्रस्त होऊन मनात शंकेची पाल चुकचुकल्याने त्यांनी सगळीकडे शोधाशोध करूनही राजु यांचा कुठेही काहीही ठावठिकाणा लागत नव्हता.
दरम्यान आज रविवारी सकाळी वाई बाजार नजिकच्या वाघाई टेकडी परिसरात त्यांचा मृतदेह आढळला असून त्यांच्या मृतदेहाशेजारी ‘मोनोसील’ नामक 500 मिलीच्या विषाची बाटली आढळून आली. त्यातील तब्बल 350 ते 400 मिली विषारी औषध शिंदे यांनी प्राशन केल्याचे प्रथमत: दिसून येेत असून घटनेची माहीती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांच्यासह पो.हे.काँ. पठाण व पो. काँ. संजय शेंंडे यांनी घटनास्थळावर धाव घेवून मयतास शवविच्छेदनासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.. दरम्यान,अत्यंत शोकाकुल वातावरणात दुपारी मयत शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अल्पभूधारक शेतकऱ्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता शासनाने पिडीत कुटुंबाला तातडीने मदत द्यावी अशी भावना उपस्थितांसह परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
अवैध सावकारची जाळे
“विशेष म्हणजे वाई बाजार येथे मागील काही वर्षांपासून आठवड्याला तब्बल शेकडा 10 टक्के एवढ्या अवाढव्य व्याज आकारणीप्रमाणे म्हणजेच (उदा. एखाद्याकडून 1000/-₹ हजार रूपये घेतल्यास आठवड्याच्या दिवशी शंभर रूपये त्या मुद्दल रकमेचे व्याज घेणारी खाजगी सावकारांची एक टोळी सक्रिय असल्याची माहीती या आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेनंतर समोर येत असून ‘तोच!’ आठवड्याला 10 टक्के व्याज रक्कम वसूली करणारा कदाचित शिंदे यांच्या आत्महत्येस कारणीभूत तर नसेल ना ? अशी शंका परिसरातील नागरिक दबक्या आवाजात बोलून दाखवत असून सदरील व्याज वसूलीकर्ता एक इसम काल रोजीही शिंदे यांच्या घरी आल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.एकंदरीत वाई बाजार येथे गोरगरीबांच्या आर्थिक गरजेचा गैरफायदा घेवून आठवडी 10 टक्के म्हणजेच महिनाकाठी तब्बल 40 टक्के व्याज वसूली करणाऱ्या अवैध सावकारीने वाई बाजारसह संपूर्ण तालुक्यात आपले जाळे पसरवत गोरगरीब गरजवंताच्या गळ्याभोवती अवाढव्य व्याजाचा फास आवळला असल्याची भयावह परिस्थिती असून अशाप्रकारचे अवैध सावकारीचे बेकायदेशीर धंदे करून सर्वसामान्यांना मृत्यूच्या खाईत लोटणाऱ्यांचा शोध घेवून त्यांचेवर कडक कार्यवाही करण्याची गरज सदरील आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेनंतर पोलिस प्रशासनासमोर निर्माण झाली आहे.