माहूर येथील फोटोग्राफरला बंदुक आणि चाकुचा धाक दाखवून दिड लाखाच्या ऐवजासह लुटले..

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

स्विफ्ट डिझायरने स्कुटीला धडक, कॅमेऱ्यासह इतर मौल्यवान ऐवजाची वाटमारी करत चोरटे पसार.

चार अज्ञात आरोपींविरुद्ध महागाव ठाण्यात गुन्हा दाखल, शिरपूर पुलावरील मध्यरात्री सिनेस्टाईल थरार.

माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
माहूर – वतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रिसेप्शनच्या फोटोग्राफीचा कार्यक्रम आटोपून माहूरकडे जात असलेल्या फोटोग्राफरच्या स्कुटीला पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीने धडक देऊन खाली पाडत गाडीतील चार अज्ञात लुटारूंनी बंदूक आणि चाकूच्या धाकावर फोटोग्राफरचा कॅमेरा आणि इतर साहित्य असा दीड लाख रुपयांच्या ऐवजासह लुटल्याची थरारक आणि खळबळजनक वाटमारीची सिनेस्टाईल घटना महागाव तालुक्यातील शिरपूर गावालगत असलेल्या पुलावर शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. याबाबत फिर्यादी शेख तनवीर शेख हरून व्यवसाय फोटोग्राफर राहणार माहूर जिल्हा नांदेड यांनी महागाव पोलिसात रविवारी ११मे रोजी सकाळी दाखल केलेल्या तक्रारीवरून अज्ञात ४ आरोपींविरुद्ध वाटमारीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

    या घटनेची हकीकत अशी की, पुसद येथील असलम खान यांच्या घरी शनिवार १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता रिसेप्शनचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाची फोटोग्राफी करण्यासाठी माहूर येथील फोटोग्राफर शेख तनवीर शेख हरून (२५) आणि त्याचा मित्र सय्यद राजीक सय्यद अनिस हे दोघे गेले होते. कार्यक्रम आटोपून हे दोघे स्कुटी ने माहूरकडे परत जात होते. दरम्यान गुंज पासून पुढे निघाल्यानंतर महागाव तालुक्यातील शिरपूर येथील पुलाजवळ पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर या वाहनाने स्कुटीला धडक दिली. या धडकेत स्कुटी वरील शेख तनवीर आणि सय्यद राजिक हे दोघेही खाली पडले. यावेळी स्विफ्ट डिझायर गाडीतून दोन अज्ञात इसम खाली उतरले, त्यांच्याकडे बंदुक आणि धारदार चाकू सारखे शस्त्र होते. बंदुक आणि शस्त्राचा धाक दाखवत या अज्ञात लुटारूंनी शेख तनवीर यांच्या हातातील सोनी कंपनीचा महागडा कॅमेरा व जुन्या सेट अपचे साहित्य हे सर्व हिसकावून घेतले. यावेळी आणखी दोघे जण स्विफ्ट डिझायर मध्ये बसून होते. फोटोग्राफर शेख तनवीर आणि सय्यद राजिक यांना धमकावत हे सर्व अज्ञात लुटारू स्विफ्ट डिझायर या वाहनाने पुसदच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. रात्री उशिरा शेख तनवीर याने महागाव पोलीस स्टेशन गाठून या घटनेची फिर्याद दाखल केली, त्यानंतर महागाव पोलिसांनी चार अज्ञात आरोपीविरोधात वाटमारीचे गुन्हे दाखल केले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकाटे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

    ऐण रहदारीच्या रस्त्यावर ही वाटमारीची गंभीर घटना घडल्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे अधोरेखित होत असले तरी,
पोलिस प्रशासनाच्या देखील काही मर्यादा आहेत. नागरिकांचीदेखील स्वसंरक्षणाची तेवढीच जबाबदारी आहे.त्यामुळे नागरिकांनी रात्रीअपरात्री उशिरा निदान दुचाकीवरून तरी प्रवास करणे टाळलेलेच बरे,असेच या वाटमारीच्या घटनेनंतर म्हणावे लागेल.

गुंज ते खडका पर्यंतचा रस्ता गुन्हेगारांना सोयीचा?…

प्राप्त माहितीनुसार,१ मे २०२४ रोजी पायरीका देवी मंदिरा जवळ हिवरदरी फाट्यावरील एका शेतात अज्ञात दरोडेखोरांनी तलवारीच्या धाकावर दरोडा टाकत एका शेतकऱ्याच्या ३० बकऱ्या सिनेस्टाईल लुटमार करीत पळविल्या होत्या, त्यानंतरच्या एका वाटमारीच्या घटनेत बोलेरो पिक अप वाहन अडवून चालक व वाहकास बांधून वाटमारी करण्यात आली होती. तर वर्षभरापूर्वी याच रस्त्यावर आणखी एक सनसनीखेज रोड रॉबरीची घटना घडली होती.

      पुसद ते माहूर स्त्यावर गुंज पासून खडका गावापर्यंतचा रस्ता चोर आणि गुन्ह्यांसाठी सोयीचा होऊ लागला आहे. वर्षभरापूर्वी१४ जुन २०२४ रोजी देखील याच ठिकाणी मासोळी घेऊन आणारे पिक अप बोलेरो हे वाहन लुटण्यात आले होते.तेलंगणा राज्यातील निर्मल पेथून मासोळी घेऊन निघालेल्या बोलेरो पिक अप महागाव तालुक्यातील गुंज- खडका मार्गावर सिनेस्टाईल लुटल्याची सिनेस्टाईल रोडरॉबरीची सनसनाटी निर्माण करणारी घटना त्यावेळी प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. यामध्ये तब्बल १० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमालावर डल्ला मारत वाटमारी करणारे भामटे पसार झाले होते.

       एकंदरीत या मार्गावर आजपर्यंत घडलेल्या वाटमारीच्या घटनेकडे निक्षून बघितल्यास मागील बऱ्याच वाटमारीच्या घटनेत पुसद ते माहूर मार्ग हा वाटमारीसाठी गुन्हेगारांना सोईचा झाला असल्याचे दिसून येत असून, महागाव,पुसद, व माहूर पोलिस प्रशासनाने याचा अभ्यास करून या वाटमारी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळून या मार्गावरून जाणे-येणे करावं कि, नाही? या चिंतेत सापडलेल्या दुचाकीस्वारांसह सर्व वाहनधारक, चालकांना भयमुक्त करावे अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!