उज्जैन येथून महाकालच्या दर्शनाहून परतणाऱ्या भाविकांचा नांदोरा जवळ भिषण अपघात; सेवानिवृत्त शिक्षकाचा पत्नी व मुलासह तीघांचा दुर्दैवी मृत्यू.

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

चालक गंभीर तर, चौघीजणी जखमी, माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथील पवार कुटुंबावर काळाचा घाला

माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी

माहूर : उज्जैन येथे महाकालच्या दर्शनासाठी गेलेल्या लोकरवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक देवराव पवार यांच्या कुटुंबीयांच्या इर्टिका गाडीची परतीच्या प्रवासात नांदोरा पाचोरा रोडवरील खामगाव जवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एका टिप्परला जबरदस्त धडक बसून झालेल्या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील सेवानिवृत्त शिक्षक,पत्नी व धाकट्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवार व सोमवारच्या मध्यरात्रीनंतर १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास घडली असून,चालक गंभीर जखमी तर गाडीतील चौघीजणी किरकोळ जखमी झाले. आज सायंकाळी ०६ वाजताच्या सुमारास अपघातातील मृतदेह लोकरवाडी येथे आणण्यात आले आहेत.

माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक देवराव गंगाराम पवार (६०) हे पत्नी बबीताताई (५५) मुलगा शुभम ( २६ ) व निकेतन ( २३), मुलगी मोनिका (२४) व प्रियंका (२०) भावाची मुलगी भुमिका (१८) आणि नात मोनिकाची मुलगी रितांशी(०२) जावई जिवन राठोड यांच्या सह तीन चार दिवसांपूर्वी किरायाची इर्टिका गाडी घेऊन उज्जैन येथे महाकालच्या दर्शनासाठी गेले होते.

   दरम्यान, देवदर्शनानंतर रविवार दि.११ रोजी पवार कुटुंब परतीच्या प्रवासाला निघाले होते. देवदर्शनासाठी गेलेल्यां पैकी जावई जिवन राठोड हे मुंबईकडे तर मोठा मुलगा शुभम जो धरमपेठ नागपूर येथे एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे हे नागपूरकडे निघून गेलेत.

    दरम्यान, पवार यांचे इर्टिका वाहनाने माहूरच्या दिशेने येत असताना खामगाव जवळ नांदोरा – पाचोरा रोडवर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एका टिप्परला जबरदस्त धडक बसून भिषण अपघात झाला. अपघातात सेवानिवृत्त शिक्षक देवराव गंगाराम पवार, त्यांची पत्नी बबीताताई व लहान मुलगा निकेतन हे गंभीर जखमी झाले.स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.तर चालक संतोष कदम (२५) राहणार करंजी या.माहूर हा गंभीर जखमी झाला असून, परिस्थिती नाजूक असल्याचे समजते.

गाडीतील देवराव पवार यांची विवाहित मोठी मुलगी मोनिका,तीची चिमुकली मुलगी रितांशी,प्रियंका व पवार यांचे लहान बंधू रामराम पवार यांची मुलगी भुमिका हे जखमी झालेत.   अत्यंत मितभाषी आणि सौज्वळ स्वभावाचे व्यक्ती असलेले सेवानिवृत्त शिक्षक देवराव पवार यांच्यासह कुटुंबातील तीघांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून,माझे भाचे सेवानिवृत्त शिक्षक देवराव पवार यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या भिषण आपत्तीमुळे आम्ही सर्व आप्तेष्ट निशब्द झाले असल्याचे मामा मनोज राठोड,मामा किसनराव राठोड यांनी अतिशय दुःखी अंतःकरणाने सांगत आज मंगळवारी १३ रोजी सायंकाळी ०६ च्या सुमारास अपघातातील सर्व मृतदेह लोकरवाडी येथे आणण्यात आले असल्याची माहिती अपघातातील मृत सेवानिवृत्त शिक्षक देवराव पवार यांचे दोन्ही मामांनी दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!