माहुर/प्रतिनिधी पंडित धुप्पे
माहूर – शैक्षणिक वर्ष 2025 या वर्षीचा शाहू फाऊंडेशन संचालित जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूर या इंग्रजी माध्यमातील शाळेचा इयत्ता दहावी बोर्डाचा निकाल परंपरेनुसार याही वर्षी शंभर टक्के लागला असून नुकतेच जाहीर झालेल्या निकालात माहूर येथील दहावी बोर्डाच्या तालुक्यातून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक येण्याचा बहुमान सुद्धा शाळेस मिळाला आहे.
दहावी बोर्डाच्या या निकालानुसार या शाळेची इश्वरी जाधव हीने ९३%गुण घेत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.तालुक्यातून द्वितीय आकांक्षा राठोड हिने ९२.४०% गुण तर तालुक्यातून तृतीय येत सत्यम चिद्दरवार याने ९१.२०%गुण घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. इतकेच नाही तर ९०%पेक्षा जास्त गुण घेणारे एकूण पाच विद्यार्थी या निकालानुसार शाळेस लाभले आहेत.
राज्यर्षी शाहू फाऊंडेशन संचालित जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूर या शाळेने आजवर आपला १००%निकाल लागण्याच्या परंपरेला कायम ठेवले आहे.हे येथील कर्तव्यदक्ष अध्यापक, पालक व मेहनती विद्यार्थी यांचे हे संयुक्त यश आहे.पण आपण येथे थांबून चालणार नाही तर याही पुढे यशाचे शिखरे आपणास गाठावी लागणार आहे असे म्हणत यशवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शाळेचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे यांनी शुभेच्छापर संदेश वर्तमानपत्रांना बोलताना दिला.
जिनियस किडझ इंटरनॅशनल स्कूल च्या या निकालानंतर यशवंत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत राष्ट्रसंत द.भ.प.सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर, माहूर चे गटशिक्षणाधिकारी क्रिष्णा भराडीया,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद माहुर तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील,माहूर नगराध्यक्ष फिरोज दोसानी,पत्रकार संघाचे अध्यक्ष सर्फराज दोसानी,पत्रकार नंदकुमार संतान,शितल भवरे, मु.अ.संजीव वाठोरे, डॉ.अरुण नखाते,मिलिंद कंधारे तसेच पालकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.