नांदेड जिल्ह्यातील शिवभोजन केंद्राची सखोल चौकशी करा – नकुल जैन

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे

नांदेड जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रात बोगस लाभार्थी दाखवून मोठ्या प्रमाणात केंद्रचालक भ्रष्टाचार करत आहेत.डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटना (म.रा) महानगराध्यक्ष नकूल जैन यांनी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री योगेश कदम यांच्याकडे शिवभोजन केंद्राची चौकशी करून केंद्र चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    याबाबत सविस्तर असे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील गोरगरीब मोल- मजूरदार यांना वेळेवर अन्न मिळत नाही म्हणून यांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शिवभोजन केंद्र चालू करण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतला यासाठी शासनाचे करोडो रुपये खर्च होत आहेत पण या करोडो रुपयाला बोगस शिवभोजन केंद्र चालकांनी चुना लावण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाच्या नियमानुसार लाभार्थ्याकडून दहा रुपये, शासनाकडून 40 रुपये प्रति असे एकूण पन्नास रुपये शिवभोजन केंद्र चालकास मिळतात अशाप्रकारे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक शिवभोजन केंद्र धारकाकडे वेगवेगळ्या लाभार्थी याद्या आहेत. प्रत्येकी शिवभोजन केंद्र चालकास 50, 75, 100, 150, 175 रु प्रमाणे लाभार्थी मंजुरी शासनाकडून देयक दिले जाते व लाभार्थ्याकडून दहा रुपये प्रमाणे हे शिवभोजन चालक रोख रक्कम घेतात. वास्तविक पाहता शासनाच्या नियमांमध्ये असे स्पष्टपणे उल्लेख केलेले आहे की शिवभोजन केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावणे अत्यंत गरजेचे असून सीसीटीव्ही च्या माध्यमातून तहसील विभागाने चौकशी करून माहे अहवाल तयार करून त्या शिवभोजन धारकाचे बिल अदा करण्यासाठी प्रस्ताव पाठवणे बंधनकारक असून सुद्धा नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. या ठिकाणी पूर्णत: बोगस नावांचा समावेश करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात “शिवभोजन केंद्र चालक जोमात, पुरवठा विभाग मात्र कोमात” असेच काही यामध्ये स्पष्ट होताना दिसत आहे अशी ही निवेदनामध्ये माहिती नमूद केली आहे.

अनेक शिवभोजन चालक राज्य शासनाच्या नियम व अटीनुसार नागरिकांना सुविधा देत नाहीत. अनेक ठिकाणी निकृष्ट भोजन दिले जाते. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे पण लावले जात नाहीत. काही शिवभोजन केंद्र बंद असून सुद्धा त्यांची बिले बनवून मंजूर केले जातात. यात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत असून या शासनाच्या आर्थिक तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या शिवभोजन चालकासह यांना बोगस देयक देण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकारी- कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे असेही या निवेदनात नमूद केले आहे .

पुरवठा विभागामध्ये काही शासकीय व निमशासकीय अधिकारी देखील शिवभोजनालयाचे बिल काढण्यासाठी आर्थिक तडजोड करत असल्याचे दबक्या आवाजात सध्या चर्चा चालू आहे .नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष असे जनसामान्याच्या हृदयात रुजलेले जिल्हाधिकारी यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या शिवभोजन केंद्र धारकासह त्यांना बोगस बिले काढून देण्यात मदत करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करतील का ? याकडे नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील समस्त नागरिकांचे लक्ष लागले  आहे.

Share This Article
error: Content is protected !!