खा.रवींद्र चव्हाण केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यात मृग नक्षत्रातील पहिल्याच पावसाचा तडाखा जिल्ह्याच्या बहुसंख्य भागाला बसला असून विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अर्धापूर व मुदखेडच्या बागायती पट्ट्यातील केळी पिकांच्या बागा आडव्या झाल्या आहेत. तसेच जिल्ह्यातल्या ९ महसुली मंडळात अतिवृष्टी झाल्याने पावसाने अक्षरशःझोडपून काढले.
जिल्ह्यात रोहिणी नक्षत्रानंतर पावसाची प्रतीक्षा होती.नांदेड शहर व आसपासच्या भागात वादळीवारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील दोन डझनहुन अधिक गावांना वादळी वारे व पावसाचा तडाखा बसला. पहिल्या पावसाने केळीच्या बागा उध्वस्त झाल्या असून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
बारड येथील प्रा.संदीपकुमार देशमुख यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खाजगी सचिवांशी संपर्क साधत मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्वरित मुदखेड व अर्धापूर भागाचा दौरा करावा, अशी मागणी केली.तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट घेऊन नुकसानी संदर्भात निवेदन देत भरीव आर्थिक मदतीचे आवाहन केले.
दरम्यान काँग्रेसचे खा.रवींद्र चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील नागेली,अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव,लहान तालुक्यातील इतर गावातील केळी पिकाच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पालकमंत्री अतुल सावे आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना संपर्क करून नुकसानीची माहिती दिली.यावेळी त्यांनी केळी पीकविमा आणि भरीव आर्थिक अनुदान केळी उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची मागणी त्यांनी केली.
जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान अर्धापूर तालुक्यात झाले असून वादळी पावसाने हाहाकार माजवला.या भागात अतिवृष्टीची नोंद नसली तरी घोंगावत आलेल्या वाऱ्याने दोन डझनहुन अधिक गावातील केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत.जिल्ह्यात ९ ते १० जून च्या सकाळपर्यंत कंधार,लोहा आणि किनवट तालुक्यातील ९ महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.
स्वयंचलित हवामान केंद्राची अवस्था वाईट.
मुदखेड व अर्धापूर तालुक्यात स्वयंचलित हवामान केंद्राची अवस्था वाईट असून अनेकदा तक्रारी करूनही कृषी विभाग गंभीर दिसत नाही.हवामान केंद्र नादुरुस्त असल्याने आणि योग्य ठिकाणी नसल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.गावोगावी हवामान केंद्र स्थापन करण्यात यावीत अशी मागणी यावेळी खा.रवींद्र चव्हाण यांनी केली.