खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी घेतला भोकरमधील विकासकामांच्या प्रगतीचा आढावा

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेडमाजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी आज भोकर शहर व तालुक्यात सुरु असलेल्या विविध महत्वपूर्ण विकासकामांची पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांसह भाजपच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या पाहणी दौऱ्यात त्यांनी ही विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत दक्षता बाळगण्याची सूचना केली. 

   आजच्या पाहणी दौऱ्यात खा. अशोकराव चव्हाण यांनी भोकर तालुक्यातील रेणापूर सुधा बृहद लघुपाटबंधारे प्रकल्पाची उंची १.१० मीटरने वाढवण्याच्या कामाची पाहणी केली. हे काम पूर्ण झाल्यानंतर सदर प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात २.५० दशलक्ष घनमीटरने वाढ होऊन भोकर शहर इतर चार गावांचा पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल. तसेच या प्रकल्पाची ९५० हेक्टरची मूळ सिंचन क्षमता पूनर्स्थापित होईल. या कामाकरिता सुमारे ४१.३९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या निधीसंदर्भात खा. अशोकराव चव्हाण यांनी नुकतीच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली होती.

भोकर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली.सुमारे ६ कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या संकुलात इनडोअर हॉल, योगा,जीम,बॅडमिंटन कोर्ट, टेबलटेनिस हॉल तसेच कबड्डी, खोखो व व्हॉलीबॉलचे मैदान तयार केले जात आहे.बंजारा समाजाच्या मागणीनुसार भोकर शहरात मंजूर झालेल्या श्री संत सेवालाल महाराज स्मारक तथा सभागृहाची देखील त्यांनी पाहणी केली. 

खा.अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून घेतले होते. सुमारे १०० कोटी रुपयांच्या या कामांतर्गत उपजिल्हा रुग्णालयाची नवी इमारत उभारली जाते आहे. 

या कामाचीही आज त्यांनी पाहणी केली.सनंतर त्यांनी अमृत-२ तलाव विकास कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या भोकरच्या महादेव मंदिर परिसरातील तलावाच्या पूनरूज्जीवन प्रकल्पाचा आढावा घेतला.हे काम सुमारे २३ कोटी रुपयांचे आहे.त्याठिकाणी वॉकिंग ट्रॅक व यात्रेच्या काळात होणारे धार्मिक कार्यक्रम,पार्किंग,पूजा साहित्य विक्रीसाठी जागा उभारली जाते आहे. 

   खा.अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी भोकर तालुक्यातील पिंपळढव साठवण तलावाच्या कामाची पाहणी केली.सुमारे ७३ कोटी रूपयांच्या या प्रकल्पामुळे मौजे पिंपळढव,डौर,जामदरी, सिद्धार्थ नगर,वाडी,मातूळ, लगळूद,व रावणगाव या गावांच्या परिसरातील ६६० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर त्यांनी मौजे नारवट,ता.भोकर येथील ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटरच्या बांधकामाची पाहणी केली.या ठिकाणी वन्य प्राण्यांच्या उपचारांची सुविधा असणार आहे.

Share This Article
error: Content is protected !!