मनसेचा अल्टिमेटम
उमरखेड ता.प्रतिनीधी /मनोज राहुलवाड
उमरखेड : पैनगंगेला पोखरून, गौण खनिजाच्या माध्यमातून, प्रशासनाला मिळणारा महसूल, स्वतःच्याचं घशात घालणाऱ्या रेती तस्करांचा, उमरखेड तालुक्यात सुकाळ झाला असून, रेती तस्करांच्या दादागिरीने तालुक्यात नुसता धुमाकूळ घातला आहे. रेती तस्करांच्या दादागिरीला कोण लगाम कसणार? किंवा कुणीतरी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संगणमताने हे रेती तस्कर दादागिरी करत नसतील ना ? आता तर रेती तस्कर गुंडगिरीवर सुद्धा उतरले, त्यांच्या विरोधात कोणी गेलं तर त्यास, गुंडगिरी करून मारण्यापर्यंत या तस्करांची मजल पोहोचली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात तर हे रेती तस्कर आठ हजार रुपये ब्रासने रेती विकताना दिसून येत आहेत. याच अवैध रेती तस्करांच्या, मुसक्या आवळण्याकरिता मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांचे मार्गदर्शनात, शेख सादिक उमरखेड तालुकाध्यक्ष यांचे नेतृत्वात, आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, योग्य वेळेत निवेदनाची दखल न घेतल्यास, मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा अल्टिमेटमचं मनसेने प्रशासनाला दिला आहे.
उमरखेड तालुक्यात अनेक गावोगावी रेतीमाफीयांनी हैदोस घालून, शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी नसताना, राजरोसपणे रेती काढून विक्री सुरू केलेली आहे. या गोरख धंद्याला नक्की कोणाचे पाठबळ मिळत आहे ?याचा कुठेच उलगडा होत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उमरखेड तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेला ट्रक आणि ट्रॅक्टर भरून, सर्रास रेती तस्करी केली जाते. अनेक अरुंद रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालविले जातात, आणि अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेच्या पैशातून तयार केलेले रस्ते, अवजड वाहतुकीमुळे दयनीय परिस्थितीत आलेले आहेत. त्यामध्ये सर्वसामान्यांचा कोणताही दोष नसताना, त्यांना रस्त्याने जाणे येणे कठीण झाले आहे. एवढ्यावर रेती माफिया थांबलेले नाहीत तर, गाव खेड्यातून त्यांच्या विरोधात कोणीही आवाज उठवू नये म्हणून, त्यांच्यावर दडपण सुद्धा आणले जाते. या सर्व गोष्टींकरिता नेमकं कोण जबाबदार आहे? याची शहानिशा करणे अत्यावश्यक आहे. आणि ती शहानिशा आपण करून संबंधितावर त्वरित कार्यवाही करावी. याबाबतचे आदेश आपल्या अधिनिस्त असलेल्या अधिकाऱ्यांना द्यावे. उमरखेड तालुक्यातील नदी, नाल्यातून अवैधरित्या रेती उपसा करून, साठा जमा करून, त्यांची विक्री सुरू आहे. याद्वारे सर्वसामान्य जनतेची लूट करण्याची एकही संधी रेती माफियाकडून सोडली जात नाही. असे निदर्शनास येत आहे. हा संपूर्ण प्रकार थांबवण्याबाबत त्वरित योग्य ती पावले उचलावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या यंत्रणेमार्फत अशा प्रकारचे अवैध धंदे बंद करण्या करिता, समोर येईल, आणि त्या परिस्थितीत उद्भवणाऱ्या परिणामास शासकीय यंत्रणा जबाबदार राहील. त्याचप्रमाणे या सर्व प्रकारांमध्ये काही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगणमताने हे सर्व अवैध धंदे सुरू आहे, असे सुद्धा ठाम मत समोर येत आहे. या गंभीर मताचा आपण योग्य तो विचार करावा व त्वरित कार्यवाही करावी. या प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना मनसे कडून देण्यात आले.
याप्रसंगी देवा शिवरामवार जिल्हाध्यक्ष मनसे, डेविड शहाणे जिल्हा उपाध्यक्ष मनसे, सादिक शेख मनसे तालुकाध्यक्ष उमरखेड, अभिजीत नानवटकर मनविसे यवतमाळ, सचिन येलगंधेवार आर्णी तालुकाध्यक्ष, हिरासिंह चव्हाण विभाग अध्यक्ष, तोसीफ ढाणकी शहराध्यक्ष, मुकुंद जोशी, आदी उपस्थित होते.
दिवसेंदिवस वाढणारी रेती तस्करी, व रेती तस्करांची दादागिरी यांनी कळस गाठला असून, प्रशासनाने आम्ही दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून, त्वरित पावले उचलावी. उमरखेड तालुक्यातील अवैध रेती तस्करीला त्वरित आळा घालावा. अन्यथा प्रशासनाचे काम आम्हाला हाती घ्यावे लागेल. त्यात उद्भवलेल्या परिस्थितीस संपूर्णतः प्रशासन जबाबदार असेल.
देवा शिवरामवार
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यवतमाळ.