जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बैल पोळा न काढण्यास केली सक्त मनाई
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड : महाराष्ट्रभर सद्या लंपी आजाराने पशुधन ग्रस्त असून नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 197 इपिसेंटर मधे गोवर्गीय पशुधन लंपी चर्मरोग या सांसर्गिक रोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे.पशुधन एकत्र आल्यास हा रोग निरोगी पशुधनास होण्याची शक्यता आहे.या कारणास्तव या वर्षीच्या बैलपोळ्यावर लंपी चे विघ्न आले असून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नांदेड जिल्ह्यातील जनावरांचे बाजार व वाहतूक बंद तसेच 14 तारखेला असलेला पोळा सन देखील एकत्र येण्यास सक्त मनाई करण्याचे परिपत्रक काढले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे कि सध्या सगळीकडे जनावरांवर लंपी या चर्मरोगाने थैमान घातले असून यामुळे पशुधनात मर्तुकीचे प्रमाण वाढत आहे.नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये 197 इपिसेंटर मधे गोवर्गीय पशुधन लंपी चर्मरोग या सांसर्गिक रोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. तसेच गोवर्गीय पशुधनांमध्ये मरतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी बैलपोळा सणानिमित्त मोठ्या संख्येने गोवर्गीय पशुधन एकत्रित येत असल्याने जिल्ह्यातील निरोगी पशुधनास लंपी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंबंधी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेडचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी एका परिपत्रकाद्वारे प्राण्यांमधील संक्रमण व सांस्कृतिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार प्राप्त अधिकारानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गोवर्गीय पशुधनाचे पोळ्यानिमित्त एकत्रित येण्यास सक्त मनाई केली आहे.तसेच सर्व पशुपालक व शेतकरी यांनी घरगुती रित्या बैलपोळा सण साजरा करावा अशी सूचना यात दिल्या आहेत.