उमरखेड/प्रतिनीधी :मनोज राहुलवाड
उमरखेड – ग्रामपंचायत हरदडा येथील सरपंचा विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला. हरदडा ग्रामपंचायत मध्ये एकूण सात सदस्य आहेत. त्यापैकी संघर्ष विजय कवडे हे अनुपस्थित असल्यामुळे, उर्वरित सहा सदस्या पैकी पाच सदस्यांनी दिनांक २१/९/२०२३ रोजी सद्यस्थितीतील सरपंच सौ. वैशाली विलास पायगन, यांचे कामावर विश्वास नसल्यामुळे, त्यांचे विरुद्ध अविश्वास प्रस्ताव, तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्याकडे दाखल केला. गावातील सरपंच आम्हाला विश्वासात न घेता गावातील सर्व कामे आपले मर्जीने करतात. त्याचप्रमाणे त्यांच्यापेक्षा त्यांचे पतीचा सदर ग्रामपंचायत च्या कामात हस्तक्षेप जास्त असतो. ते पूर्वीपासून आम्हाला विश्वासात घेत नाहीत. परंतु पुढे तरी घेतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी आजपर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतचे कामात आम्हास सोबत, अथवा विश्वासात घेतले नाही. आता आमचा त्यांच्यावर अथवा त्यांचे कामावर विश्वास नाही, म्हणून आम्ही वरील सर्व सदस्य सरपंच सौ. वैशाली विलास पायगन यांचे विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करीत असल्याचे निवेदन, विनोद विठ्ठल गुड्डलवाड, लता दत्ता तिळेवाड, प्रतिभा प्रवेश कवडे, जनाबाई मारोती लांडगेवाड, सुनीता प्रशांत दवणे या सर्व सदस्यांनी, सहीनिशी तहसीलदार उमरखेड यांच्याकडे दाखल केला.
या अनुषंगाने दिनांक २९/९ / २०२३ रोजी दुपारी २ वाजता, ग्रामपंचायत कार्यालय हरदडा येथे आनंद देऊळगावकर तहसीलदार उमरखेड यांचे अध्यक्षतेखाली, सरपंच वैशाली विलास पायगन यांच्याविरुद्ध, अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली. सरपंच सौ. वैशाली पायगन यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास प्रस्तावावर, चर्चेसाठी विशेष सभेची सुरुवात करण्यात आली. सभे करिता सुचक सुनिता दवणे, अनुमोदक विनोद गुड्डलवार होते. अविश्वास नोटीस मध्ये सर्व मुद्द्यांवर सविस्तर वाचन करून, उपस्थित सदस्यांना चर्चे करिता सूचना देण्यात आली. यावर सविस्तर चर्चा करून सरपंच सौ. वैशाली विलास पायगन यांनी त्यांची बाजू मांडली. व सर्व दोष आरोप त्यांनी फेटाळले. तसेच सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच काम करतो असे सांगितले. अविश्वास प्रस्ताव मतदानासाठी ठेवण्यात आला. अविश्वास ठरावाच्या बाजूने लता तिळेवाड, प्रतिभा कवडे, जनाबाई लांडगेवाड, विनोद गुड्डलवार या सदस्यांनी हात वर करून मतदान केले. तर संघर्ष कवडे हे अनुपस्थित होते. अविश्वास ठरावाच्या विरुद्ध वैशाली पायगन यांनी मतदान केले. वरील प्रमाणे सात सदस्या पैकी संघर्ष विजय कवडे अनुपस्थित होते. वरील उपस्थित सहा सदस्या पैकी पाच सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केल्यामुळे, आजच्या अविश्वास विशेष सभेमध्ये सौ. वैशाली विलास पायगन यांच्याविरुद्ध, एकूण सदस्याच्या ३/४ तीन चतुर्थांश मते न पडल्यामुळे, अविश्वास ठराव फेटाळण्यात (नामंजूर) करण्यात आला. असे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी सांगितले.6