उपोषणकर्ते रुग्णालयात भरती
धरण विरोधात जनतेचा आक्रमक पवित्रा कायम
माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर – निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्यावतीने विदर्भ मराठवाडयात साखळी व आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून,आमरण उपोषणाच्या शुक्रवार दि. ०८ नोव्हेंबर या आजच्या चौथ्या दिवशी 11 गावातील 45 आमरण उपोषणकर्त्यांपैकी 15 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये हलविण्यात आले
आहे.असे असले तरी जनतेच्या मनात धरण विरोधी भावना दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याबाबत वृत्त असे की,माहूर,
किनवट तालुक्यातील सिंदखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मराठवाड्याच्या 11 गावांमध्ये धरण विरोधी संघर्ष समितीच्यावतीने आयोजित आमरण उपोषण सुरू आहे. त्यामध्ये बोंडगव्हाण,गोकुळ गोंडेगाव,पाथरी,रामपूर, सायफळ,मदनापूर,सावरखेडा, चिंचखेड,बामनगुडा,पडसा, वडसा या गावांचा आमरण उपोषणामध्ये समावेश आहे. या 11 गावांतील 45 जण आमरण उपोषणाला बसले असून, उपोषणाच्या शुक्रवारी चौथ्या दिवशी वेगवेगळ्या गावातील 15 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे.ज्या ज्या ठिकाणचे उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले त्या त्या ठिकाणी नवीन उपोषणकर्ते आमरण उपोषणात सहभागी होत आहेत.
साखळी उपोषणाचा अकरावा दिवस आणि आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून, धरण विरोधी संघर्ष समितीची मराठवाडयातील उपोषणाची ही कठीण स्थिती असूनही आजपर्यंत पोलीस विभाग व आरोग्य विभागा व्यतिरिक्त इतर कोणत्याही विभागाने किंवा शासकीय अधिकाऱ्याने आमरण उपोषण मंडपात भेट दिली नाही किंवा उपोषणकर्त्यांशी चर्चा केलेली नसल्याने शासनाविरुद्ध बुडीत क्षेत्रातील जनतेत असंतोष खदखदला जाऊन आणखीणच वाढत असल्याचे दिसून येत आहे.