मराठा आरक्षण दिले नाही, तर राज्यात कुठल्याच निवडणूक होणार नाही! मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

मुंबई – मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात मराठा आरक्षणाबद्दल जे काही भाष्य केले आहे, त्यात अधिक स्पष्टतेची गरज आहे. नुसत्या घोषणांना आता मराठा समाज फसणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिले, परंतु त्या दरवाजाला कडीच लावली नाही, असे फटकारतानाच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण दिले नाही तर निवडणुका होणार नाहीत, असा स्पष्ट इशारा मिंधे सरकारला दिला.

आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधिमंडळात मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या निवेदनाची चिरफाड केली. मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण निवेदनात आरक्षणाबाबत जी स्पष्टता हवी होती ती यत्किचिंतही दिसली नाही. ठरल्याप्रमाणे जे दोन शब्द राहिले आहेत त्याबद्दलही मुख्यमंत्री बोलले नाहीत. ते शब्द घेतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. परंतु २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळेल की नाही हे मुख्यमंत्र्यांना स्पष्टच सांगावे लागेल. त्यासाठीच आम्ही थांबलो आहोत. आरक्षण दिले परंतु त्यात पुन्हा मेख ठेवली तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. असे मनोज जरांगे म्हणाले.

आरक्षणाच्या संदर्भात शासन निर्णय निघणार असेल तर त्यात कोणत्याही अटीशर्ती घालू नका, असेही मनोज जरांगे यांनी बजावले. सरकारने योग्य भूमिका घेतली तर आम्हाला २४ डिसेंबरनंतर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असेही ते म्हणाले. फक्त घोषणा करून भागणार नाही, हे सरकारने लक्षात ठेवावे. टिकणारे आरक्षण द्या, नाहीतर जड जाईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

रक्ताच्या सोयर्‍यांना आरक्षण देणार का?

आई ओबीसी असेल तर मुलाची जात ओबीसी लावू देणार का?

रक्ताच्या सोयर्‍यांना आरक्षणात आणण्यासाठी काय अटी आहेत?

मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट करतील अशी मला अपेक्षा आहे. पण आरक्षणासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका समोर न आल्यास बीड येथे 23 डिसेंबर रोजी मराठा समाजाची सभा होणार आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!