मुंबई – राज्यामध्ये खरीप कालावधीत युरिया व डीएपी खतांचा तुटवडा भासू नये या दृष्टीने युरिया व डीएपी चा संरक्षित साठा करण्यात यावा अशा सूचना आज आयोजित बैठकीत दिल्या.
सह्याद्री अतिथिगृह येथे पार पडलेल्या या बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे अरुण दलाल, महाराष्ट्र कृषि व उद्योग विकास महामंडळचे महेंद्र बोरसे तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खरीप हंगामातील जून व जुलै महिन्यामध्ये युरिया व डीएपी खतांची आवक मागणीपेक्षा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे संभाव्य तुटवडा भासू नये म्हणून साठा संरक्षित करण्याचे निर्देश दिले.
एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीतील दीड लाख मेट्रिक टन व 0.25 लाख मीटर डीएपी खताचा संरक्षित साठा राज्यामध्ये करण्यासाठी नोडल एजन्सींना खत साठवणूक, वाहतूक विमा खताची चढाई उतराई, जीएसटी सेवा शुल्क इत्यादी अनुषंगिक खर्चासाठी निधीची तरतूद करण्यात येईल. संरक्षित साठा करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही करावी असेही निर्देश दिले आहेत.