क्रांतिसिह नाना पाटील यांचा साताऱ्यातून लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. क्रांतीसिंह भारतीय कम्युनिष्ठ पक्षाकडून निवडणूक लढवत होते तर किसन वीर काँग्रेसकडून.या निवडणुकीत किसन वीर (आबा) विजयी झाले.
धक्कादायक पराभवानंतर सातारला क्रांतिसिंह नानांची एक सभा झाली. या सभेत पराभवाचे विश्लेषण सुरु असताना या सभेत एक वक्ता उठला आणि किसन वीर यांच्या विरोधात अतिशय वाईट शब्दात आरोप करू लागला. ते ऐकून क्रांतिसिंह नाना पाटील उठले. त्यानी त्या बेताल बोलणाऱ्या वक्त्याच भाषण थांबवत आणि म्हणाले,”अरे,मला ज्यांनी पराभूत केलंय ते किसन वीर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आहेत, ते भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत.
मला त्यांचा अभिमान आहे.मला पराभूत करणारा माणूस मोठा आहे.मी कुठल्या भांडवलदाराकडून पराभूत झालेलो नाही तर एका देशभक्तान मला पराभूत केल आहे.”
विरोधकांशी कस वागलं पाहिजे याचा धडा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी याप्रसंगातून घालून दिला.
राजकीय विरोधक म्हणजे शत्रू नसतो, राजकीय वैर विचारांचे असते ते व्यक्तिगत नसते.ती विचारांची लढाई असते याच भान आजची राजकारणी लोक विसरून गेली आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्याचा घसरलेला दर्जा, नेत्यांची परस्पराविषयीची भाषा,ट्विटच्या माध्यमातून एकमेकांवर अगदी खालच्या भाषेत जाऊन होणारी कडवट टीका बघताना पूर्वीच्या काळातील क्रांतीसिंह किसनवीर यांची आठवण येते.